गडचिरोलीत मराठी नामफलकासाठी मनसे विद्यार्थी सेनेचा इशारा
आस्थापनांना समजपत्र; नियमांचे पालन न झाल्यास आंदोलनाचा इशारा
गडचिरोली : महाराष्ट्राची राजभाषा मराठी असून राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, कार्यालये व विविध आस्थापनांच्या नामफलकांवर मराठी भाषेतील पाटी मोठ्या व ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील विविध आस्थापनांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने समजपत्र देण्यात आले.
या समजपत्रात शासन निर्णय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक आस्थापनाने मराठी भाषेतील नामफलक लावणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही ठिकाणी अद्यापही मराठी भाषेतील पाट्या नसल्याचे किंवा इतर भाषेच्या तुलनेत मराठी अक्षरे लहान असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.
मनसे विद्यार्थी सेनेने आस्थापनाधारकांना तातडीने नामफलकात बदल करून देवनागरी लिपीत मराठी भाषा ठळकपणे दर्शविण्याचे आवाहन केले आहे. तसेच दिलेल्या मुदतीत नियमांचे पालन न झाल्यास संबंधित आस्थापनांसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे शहरात मराठी नामफलकांच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.








