Home Breaking News *जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार २०२०-२१ साठी प्रस्ताव आमंत्रित*

*जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार २०२०-२१ साठी प्रस्ताव आमंत्रित*

8

*जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार २०२०-२१ साठी प्रस्ताव आमंत्रित*

 

*उत्कृष्ट खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांच्या गौरवासाठी २६ मेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ*

 

गडचिरोली, (जिमाका) दि.18 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण २००१ अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत सन २०२०-२१ या वर्षासाठी जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू, दिव्यांग खेाडळू तसेच उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या पुरस्कारांद्वारे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा उद्देश आहे.

 

या पुरस्कारामध्ये गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला) तसेच दिव्यांग गुणवंत खेळाडू या प्रवर्गांचा समावेश असून, पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रुपये १० हजार रोख असे राहणार आहे. पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील संपूर्ण प्रस्ताव बंद लिफाफ्यातून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे सादर करावयाचे आहेत.

 

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. क्रीडा मार्गदर्शक प्रवर्गासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्रात किमान दहा वर्षे सातत्याने क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे तसेच त्यांचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक असणे बंधनकारक आहे. गुणांकनासाठी संबंधित जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाणार आहे. गुणवंत खेळाडू व दिव्यांग खेळाडूंनी पुरस्कार वर्षासह मागील पाच वर्षांपैकी किमान दोन वर्षे जिल्ह्याचे मान्यताप्राप्त अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलेले असणे आवश्यक आहे.

 

एकाच व्यक्तीस एका खेळासाठी किंवा एका प्रवर्गासाठी पुन्हा पुरस्कार मिळणार नसून, जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्तीला अन्य जिल्ह्यातून अर्ज करता येणार नाही. पुरस्कार वर्षाची गणना १ जुलै ते ३० जून या कालावधीनुसार करण्यात येणार असून सन २०२०-२१ साठी ३० जून २०२१ पर्यंतचा कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे.

 

अर्जासोबत सादर करण्यात येणारी सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे सत्य असल्याबाबतचे हमीपत्र जोडणे अनिवार्य राहणार आहे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शकांसाठी खेळाडूनिहाय स्वतंत्र हमीपत्र आवश्यक राहील. तसेच एकाच खेळाडूकडून एका प्रशिक्षकास एकदाच हमीपत्र देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत आता २६ मे २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

जिल्ह्यातील पात्र खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांनी विहित वेळेत संपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. उशिरा प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी व विहित नमुना अर्ज प्राप्त करण्यासाठी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.

Don`t copy text!