Home Breaking News *युद्धपातळीवरील दुरुस्तीनंतर सिरोंचा परिसरातील वीजपुरवठा सुरळीत*

*युद्धपातळीवरील दुरुस्तीनंतर सिरोंचा परिसरातील वीजपुरवठा सुरळीत*

8

*युद्धपातळीवरील दुरुस्तीनंतर सिरोंचा परिसरातील वीजपुरवठा सुरळीत*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. 09 : सिरोंचा तालुक्यातील वीजपुरवठा खंडित होण्यामागे 132/66 केव्ही आलापल्ली उपकेंद्रातून सिरोंचा येथे जाणाऱ्या 66 केव्ही अतिउच्चदाब वाहिनीवरील अनेक तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली आहे. वादळी वाऱ्यांमुळे व मोठी झाडे कोसळल्याने वाहिनीवर विविध ठिकाणी बिघाड निर्माण झाला होता. अतिउच्चदाब विभागाच्या पथकांनी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे पूर्ण करून सिरोंचा परिसरातील वीजपुरवठा सुरळीत सुरू केला आहे.

 

आलापल्ली येथील 132/66 केव्ही उपकेंद्रापासून सिरोंचा येथील 66 केव्ही उपकेंद्रापर्यंतची वाहिनी सुमारे 93 किलोमीटर लांबीची असून तिचा बहुतांश भाग वनक्षेत्रातून जातो. या वाहिनीवरील बिघाडामुळे सिरोंचा परिसरातील सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा प्रभावित झाला होता.

 

अतिउच्चदाब विभागाच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीची कामे हाती घेतली. वाहिनीवरील विविध बिघाडग्रस्त ठिकाणांची टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करण्यात आली. विशेषतः मोठी झाडे कोसळल्याने निर्माण झालेल्या अडचणींवर मात करत पथकांनी प्रतिकूल परिस्थितीतही अखंडितपणे काम सुरू ठेवले. परिणामी प्रभावित वाहिनीची दुरुस्ती पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

 

दरम्यान, आलापल्ली ते एटापल्ली दरम्यानची 132 केव्ही वाहिनीदेखील वादळामुळे काही काळ बंद पडली होती. या वाहिनीवरील एका टॉवरचा क्रॉस-आर्म वाकल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र आवश्यक दुरुस्ती करून ही वाहिनीही पूर्ववत करण्यात आली आहे.

 

सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित उपकेंद्रांमधील यंत्रणांची तपासणी करण्यात आली असून सर्व उपकेंद्रांतील उपकरणे व यंत्रणा सुस्थितीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण हे केवळ अतिउच्चदाब वाहिनीवरील बिघाड असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

प्रशासन व महावितरणच्या समन्वयातून दुरुस्तीची कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली असून सध्या सिरोंचा परिसरातील वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.

Don`t copy text!