*जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत युवा जलदिंडी अभियान संपन्न*
*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रॅली, पोस्टर प्रदर्शन आणि जलसंवर्धनाची सामूहिक शपथ*
गडचिरोली, दि. ९ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चामोर्शी येथे नुकतेच आयोजित युवा जलदिंडी अभियान उत्साहात संपन्न झाले. जलसंवर्धन, जलसाक्षरता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘मेरा युवा भारत’ (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार), ‘यशदा’ (महाराष्ट्र शासन) आणि युनिसेफ (संयुक्त राष्ट्र बाल निधी) यांच्या मार्गदर्शनाखाली हरडे महाविद्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले श्री. सारंग मेश्राम, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, गडचिरोली यांनी युवकांना जलसाक्षरतेचे महत्त्व पटवून देत सामाजिक विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. महेश जोशी, प्रा. वैशाली कावळे आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कु. जान्हवी पेद्दीवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढत्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर, जलस्रोतांचे जतन आणि वृक्षसंवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे तसेच पाण्याचा अपव्यय टाळून पर्यावरण संवर्धनात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चे कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. यानंतर विद्यार्थ्यांनी चामोर्शी शहरातून जनजागृती रॅली काढून जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याची बचत, वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला. तसेच पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून जलसंकट, हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणाबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.
या अभियानात महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, प्राध्यापक वर्ग तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले होते.




