*मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी; ‘अमृत मानसमित्र’ समुपदेशक प्रशिक्षणासाठी अर्ज सुरू होणार*
*मानसशास्त्र, समुपदेशन व सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण; रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध*
गडचिरोली, दि. ९ : विद्यार्थ्यांमधील वाढता शैक्षणिक ताण, भावनिक समस्या, वर्तनात्मक अडचणी, सोशल मीडिया व डिजिटल व्यसन, करिअरविषयक संभ्रम आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विविध आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) मार्फत “अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम” राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींना मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर घडविण्याची तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था तांत्रिक भागीदार म्हणून कार्य करणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि क्षमता विकासाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या या संस्थेमार्फत प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, प्रशिक्षण पद्धती, पर्यवेक्षण (सुपरव्हिजन) आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी पार पाडली जाणार आहे.
अमृत मानसमित्र कार्यक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि जीवनकौशल्य विकासासाठी प्रशिक्षित समुपदेशक तयार करण्यात येणार आहेत. प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी समुपदेशनाची मूलतत्त्वे, बाल व किशोर मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये व सक्रिय श्रवण, तणाव व्यवस्थापन, जीवनकौशल्य शिक्षण, आत्महत्या प्रतिबंध, संकट व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, डिजिटल आरोग्य, पालक व शिक्षकांशी समन्वय, मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन तसेच शाळा आधारित समुपदेशन व रेफरल प्रणाली यांचा समावेश असेल.
*कौशल्य विकासावर विशेष भर*
या प्रशिक्षणात सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष समुपदेशन कौशल्ये, केस स्टडी, रोल प्ले, पर्यवेक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि क्षेत्रीय अनुभव यांचा समावेश असेल. प्रशिक्षणाचे स्वरूप हायब्रीड (ऑनलाइन व ऑफलाइन) असून १५ दिवसांचे प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण, एक महिन्याची निरीक्षणाधारित क्षेत्रीय नियुक्ती, ऑनलाइन तज्ज्ञ सत्रे, केस चर्चा तसेच सहा महिन्यांचे मार्गदर्शन व सुपरव्हिजन यांचा समावेश राहणार आहे.
*प्रशिक्षणानंतर विविध क्षेत्रांत संधी*
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना शाळा व महाविद्यालयीन समुपदेशक, मानसमित्र समुपदेशक, जीवनकौशल्य प्रशिक्षक, मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक, पालक व शिक्षक कार्यशाळा समन्वयक, विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून कार्य करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतंत्र समुपदेशन सेवा सुरू करण्याचीही संधी मिळू शकते.
*पात्रता आणि निवड प्रक्रिया*
एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) ही शैक्षणिक पात्रता असलेले तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवार या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
प्रत्येक बॅचमध्ये साधारणतः २० ते ३० उमेदवारांची निवड करण्यात येणार असून जिल्हानिहाय गरज, विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध संसाधनांचा विचार करून प्रवेश दिला जाणार आहे.
*प्रशिक्षण पुण्यात; शैक्षणिक खर्च अमृतकडून*
सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील १५ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथे होणार आहे. या कालावधीतील निवास व भोजनाची व्यवस्था प्रशिक्षणार्थींनी स्वतः करावयाची आहे. मात्र अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याने हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत उपलब्ध होणार आहे.
*प्रमाणपत्रामुळे करिअरला चालना*
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना “अमृत मानसमित्र समुपदेशक” हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. या प्रमाणपत्राच्या आधारे शैक्षणिक संस्था, मानसिक आरोग्य उपक्रम आणि जीवनकौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
*१५ ते २२ जूनदरम्यान ऑनलाइन अर्ज*
अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचसाठी १५ जून ते २२ जून २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. पात्र उमेदवारांना छाननीनंतर ई-मेल किंवा संदेशाद्वारे कळविण्यात येईल. “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असून मुदतीत प्रवेश न घेतल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.
या योजनेविषयी अधिक माहितीसाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक, कार्यालय, गांधी चौक येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




