Home Breaking News कुकामेटा लष्कर नाला पुलासाठी भाकपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; उशीर झाल्यास आंदोलनाचा इशारा

कुकामेटा लष्कर नाला पुलासाठी भाकपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; उशीर झाल्यास आंदोलनाचा इशारा

31

कुकामेटा लष्कर नाला पुलासाठी भाकपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; उशीर झाल्यास आंदोलनाचा इशारा

गडचिरोली, दि. १२ जून २०२६: भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागातील कुकामेटा लष्कर नाला येथे पूल बांधण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) आज जिल्हाधिकारी गडचिरोली यांना तहसीलदार भामरागड यांच्यामार्फत निवेदन दिले. यावेळी पाच गावांतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सन २०२१-२२ मध्ये कुकामेटा लष्कर नाला येथे पूल बांधकामासाठी साहित्य आणले गेले आणि पिलरसाठी खड्डेही खोदण्यात आले; मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. गोपनार, लष्कर, आलदंडी, धिंरगी व मोरडपार या पाच गावांना पावसाळ्यात नाल्याला पूर आल्याने संपर्क पूर्णपणे तुटतो. यामुळे माडिया आदिवासीबहुल या भागातील नागरिकांना दरवर्षी अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.

पावसाळ्याच्या चार-पाच महिन्यांत ही पाचही गावे बेटासारखी तुटून पडतात. गरोदर महिलांना प्रसूतीसाठी किंवा सर्पदंश, मलेरियासारख्या आजारांत रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेणे अशक्य होते. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. नाला ओलांडण्याच्या प्रयत्नात अनेकदा बैलगाड्या व दुचाकी वाहून गेल्याच्या घटना घडतात. पूर कायम असल्याने गावांमध्ये रेशनचे धान्यदेखील महिनोन्महिने पोहोचू शकत नाही, तर स्थानिक शेतमाल व तेंदूपत्ता बाजारपेठेत नेता येत नसल्याने नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनतो. मुलांचे शिक्षण सलग महिने ठप्प राहते, परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. जीव मुठीत धरून नागरिक हा नाला पार करत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी निवेदनादरम्यान मांडली.

या पार्श्वभूमीवर भाकपाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तीन ठोस मागण्या केल्या आहेत. २०२१-२२ मधील अपूर्ण कामाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जाहीर करावी, कुकामेटा लष्कर नाला पूल मंजूर आहे की नाही याची तातडीची माहिती द्यावी व मंजूर नसल्यास तात्काळ मंजूर करावा, तसेच निश्चित कालमर्यादेत पूल बांधकाम पूर्ण करावे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भाकपा व स्थानिक आदिवासी नागरिक तीव्र आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

यावेळी निवेदन देण्यासाठी भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सूरज जककुलवार, ॲआयवायएफ तालुका अध्यक्ष कॉ. दिनेश आरकी, कॉ. सुरेश मज्जी, रमेश कालंगा, देवाजी परसा, सुधाकर आतलामी, दिनेश मटाटामी, अजय कुमोटी, सुरेश दुर्वा, चिन्ना मडकामी यांच्यासह पाचही गावांतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Don`t copy text!