पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड विश्वजीत कोवासे यांचा इशारा
गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी डॉक्टर, कर्मचारी व औषधांचा तुटवडा, आरोग्य सेवेच्या अभावामुळे बोगस डॉक्टरांना सुळसुळाट
पावसाळ्याला सुरुवात झाली असून रोहिणी नक्षत्रानंतर मृग नक्षत्रातील पावसाची हजेरी लागली आहे. मात्र अधूनमधून उष्णतेचा तडाखा कायम असून कधी ऊन तर कधी पाऊस अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.
ताप, सर्दी, खोकला, डायरिया, इन्फेक्शन, गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत असताना तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची दयनिय अवस्था चिंतेचा विषय बनली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पालकाच्या जिल्ह्यात अशी दयनीय अवस्था असेल तर बाकी जिल्ह्याच काय त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आरोग्य सेवा तातडीने सुरळीत करण्याची मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. अनेक ठिकाणी परिचारिका, आरोग्य कर्मचारी व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव जाणवत आहे. आपल्या मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे.
अनेक केंद्रांमध्ये आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी औषध दुकानांचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना किरकोळ आजारांसाठीही तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. काही गावांमध्ये आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर नियमित उपलब्ध नसल्याने रुग्णांना तासन तास प्रतीक्षा करावी लागते. गंभीर रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात हलवावे लागत असून त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. म्हणून पावसाळा येण्यापूर्वीच गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी दिला आहे.





