कोनसरी परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची महावितरणकडे मागणी.

173

आष्टी-

कोनसरी व कोनसरी परिसरातील गावांचा वीजपुरवठा गेल्या आठवड्याभरापासून वारंवार खंडित होत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी कोनसरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आष्टी येथील महावितरणच्या अभियंत्याला निवेदन देऊन केली.

मागील आठवड्यापासून कोनसरी व कोनसरी परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे कोनसरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती असलेल्या गरोदर मातांना व रुग्णांना विजेअभावी त्रास सहन करावा लागत आहे.तसेच विजेअभावी कोविड19 ची लस खराब होण्याच्या स्थितीत आहे.

या सर्व बाबीचा गंभीरपणे विचार करून कोनसरी व कोनसरी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा अशा मागणीचे निवेदन आज ग्रामपंचायत कोनसरीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात महावितरण केन्द्र आष्टीचे अभियंता श्री विंचुलकर यांना दिले.

यावेळी ग्रा.प. उपसरपंच राकेश दंडकिवार, ग्रा.प. सदस्य संजय कुमरे, ग्रा.प. सदस्य विजय सिडाम, ग्रा.प. सदस्य गणेश ईप्पावार,भास्कर बावणे,रमेश म्हशाखेत्री आदी उपस्थित होते.