नक्षल्यांनी पुरुन ठेवलेली 16 लाखाची रक्कम जप्त

520

◆ मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्याचाही समावेश

●जिल्हा पोलिसांची यशस्वी कामगिरी

एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणा-या कुदरी जंगल परिसरातील घटना

गडचिरोली ब्युरो.:-
नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणा-या कुदरी जंगल परिसरात गुरुवारी शोध मोहिम राबवित असतांना नक्षल्यांनी पुरून ठेवलेली 15 लाख 96 हजारांची रोख रक्कम व स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिस दलास मोठे यश आले आहे. जब्त करण्यात आलेल्या रक्कमेमध्ये संपूण 2 हजाराच्या नोटा असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज, 2 जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलिस अधीक्षकांनी म्हटले की, नक्षल नेहमी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी राबविले जाणारे बांधकाम, रोजगार, तेंदूपत्ता कंत्राटदार, सामान्य नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करून ती रक्कम देश विघातक कृत्यासाठी वापरतात. तसेच जिल्ह्यात हिंसक कारवाया करण्यासाठी लागणारे शस्त्र, साहित्य, दारुगोळा इत्यादी खरेदी करण्यासाठी वापरतात. या कामाकरिता जमा करण्यात आलेला सर्व पैसे व शस्त्र साहित्य, दारुगोळा इत्यादी ते गोपनीय ठेवतात. त्याकरिता गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधिक्षक मनीष कलवानीया, अपर पोलिस अधिक्षक समीर शेख, सोमय मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. 1 जुलै रोजी एका मोठ्या नक्षलविरोधी अभियानाचे आयोजन करून सी-60 जवानांसह इतर अभियान पथकाचे जवान यांनी मिळून हालेवारा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कुदरी जंगलपरिसरात मोठी जोखीम घेऊन नक्षलविरोधी अभियान राबविले. यात जवानांना मोठे यश मिळाले आहे.
पेरुन ठेवेली रक्कम हस्तगत करण्यात आल्याने या भागात नक्षल्यांना मोठा हादरा बसलेला आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या लक्षात आलेले आहे की गडचिरोली पोलिस दलाची नजर नक्षल्यांवर असून सामान्य नागरिकांकडून खंडणी वसूल करणे नक्षल्यांना आता अडचणीचे ठरणार आहे.

नक्षल साहित्यात याचा समावेश
जवानांनी नक्षल्यांनी पेरुन ठेवलेले लाखो रुपये जप्त केले. दरम्यान घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्यही जप्त करण्यात आले. यामध्ये इलेक्ट्रिक बटन 4 नग, स्विच 1 नग, डेटोनेटर 3 नग, वायर बंडल 2 नग, वाकी टाकी 1 नग, नक्षल पॉम्पलेट, बॅनर, पिट्टू व इतर साहित्यांचा समावेश आहे.

नक्षल्यांद्वारे ठेकेदार तसेच सर्वसामान्यांकडून पैसे वसुल करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षापासून सुरु आहे. नक्षली सदर पैसे घरात ठेवण्याएवजी जंगला पेरुन ठेवतात. नक्षल्यांची ही निती खुप जुनी आहे. कुदरी जंगल परिसरात पेरुन ठेवण्यात आलेली रक्कम दोन वर्षापूर्वीची असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर कारवाईअंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक मनिष कालवानिया, अप्पर पोलिस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

जवानांचे केले कौतूक
नक्षली अत्यंत गुप्तरित्या नक्षल साहित्य खरेदीसाठी पैसे पेरुन ठेवित असतात. मात्र जिल्हा पोलिस जवानांनी नक्षल्यांची ही योजना निष्पळ ठरविली आहे. लाखो रुपये जप्त करण्यात आल्याने पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथकाचे कौतुक केले आहे. तसेच सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.