बिबट्याला जेरबंद करण्याची वारंवार मागणी करूनही वनविभागाचा दुर्लक्षितपणा कायम
चामोर्शी-
दिनांक 12 सप्टेंबर रविवारला तालुक्यातील आष्टी (इल्लूर) येथील पेपर मिल कॉलनीत बिबट्याने 8 वर्षीय बालकांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची दुर्दैवी घटना घडली.
सायंकाळी साडे सातच्या सुमारास पेपर मिल कॉलनीतील बालक अंश मनोज मोरे वय वर्ष 8 हा सुरक्षा रक्षक परवेश सिंग याच्या समवेत आरतीसाठी मंदिराकडे जात असताना दबा धरून असलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.सोबत असलेल्या सुरक्षा रक्षक परवेश सिंग याने काठीने त्याला परतवून लावले. यात अंश मोरे हा बालक जखमी झाला.परवेश सिंग याने बिबट्याला परतवून लावले नसते तर बालकाचा जीव गेला असता.त्याला त्वरित आष्टी येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.जखमी बालकावर प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी बालकास मदतीसाठी टाळाटाळ केली.यावेळी उपस्थित आष्टीचे माजी उपसरपंच,शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी त्वरित मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्याशी भ्रमण ध्वनिवरून चर्चा करून मदत करण्याच्या निर्देश मार्कंडा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यास सांगितले.तेव्हा त्यांनी तशा सुचना दिल्या व मदत केली
पेपर मिल कॉलनीतल्या जंगलात वास्तव्यास असलेल्या हा बिबट्या इल्लूर येथील बकऱ्या,कोंबड्या आदी पशूधन नष्ट करण्याचा सपाटा लावला.या बिबट्यामुळे आष्टी परिसरात दहशतीचे वातावरण आहे.नागरिकांनी वारंवार वनविभागाकडे या बिबट्याच्या त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करूनही मुजोर वनविभाग सातत्याने या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.या दुर्लक्षितपणामुळेच आज मनुष्य हानी झाली असती.वनविभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास पुन्हा हल्ला होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.