कंत्राटी वाहनचालक, सफाई कामगारांचे मानधन थकीत – जिप अध्यक्षांपुढे मांडल्या समस्या

87

गडचिरोली :-
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कंत्राटी वाहनचालक व सफाईगाराची नियुक्ती बाह्यस्त्रोत संस्थेमार्फत करण्यात आली आहे. मात्र या वाहनचालक व सफाईगाराचे गेल्या 18 महिन्यांपासूनच मानधन थकीत असल्याने हे कर्मचारी अडचणीत आले आहेत. कंत्राटी वाहनचालक व सफाईगारांनी जिपचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांची सोमवारी भेट घेवून त्यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या व मागण्यांचे निवेदन सादर केले.
आरोग्य विभागाच्या 16 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2020 या कालावधीत मानवसेवा बहुउद्देशिय बेरोजगार सहकारी संस्था नागपूर यांना कंत्राट देण्यात आले. त्यानंतर 22 जुलै 2020 ते आजतागायत नाशिकच्या रयत स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला कंत्राट देण्यात आले असून या संस्थेमार्फत कंत्राटी स्वरुपात मानधन तत्वावर वाहनचालक व सफाईगारांची नियुक्ती करण्यात आली. कोरोना काळात तसेच आजतागायत आम्ही प्रामाणिकपणे मुख्यालयी राहून रुग्णसेवा करीत आहोत. मात्र आम्हाला वेळेवर मानधन मिळत नसल्या कारणाने आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे, असे संघटना व कर्मचा-यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना फिरोज खॉ पठाण, राहूल सहारे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

मासिक मानधन वेळेत अदा करा
कर्मचा-यांची पिळवणूक लक्षात घेऊन बाह्यस्त्रोत संस्थेद्वारा नियुक्ती न देता आरोग्य विभाग जिल्हा परिषदेमार्फत किंवा एनआरएचएममध्ये कंत्राटी पद्धतीने थेट नियुक्ती देण्यात यावी तसेच मासिक मानधन वेळेत अदा करावे, अशी मागणी वाहनचालकांनी यावेळी केली.

कर्मचा-यांची पिळवणूक
कंत्राटी वाहनधारकांचे मासिक मानधन 19 हजार 664 इतके आहे. तसेच सफाईगारांचे मासिक मानधन 15 हजार 493 रुपये आहे. मात्र वाहनचालकास 10 हजार 700 रुपये तर सफाईगारांना 8 हजार 595 रुपये मानधन संस्थेमार्फत दिले जात आहे. त्यामुळे कर्मचा-यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप कंत्राटी वाहनचालक व सफाईगारांनी केला आहे.