कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतली ती भयावह परिस्थिती. कोरोनाने पतीचे निधन झालेले.स्वतः गृहविलगीकरणात, मुलं दुसऱ्यांकडे. असे ते दिवस आजही आठवले तरी अंगावर शहारे येतात.तरीसुद्धा कोमल हूं कमजोर नही मै, शक्ती का नाम नारी है, असे स्वतःला समजावून रडत न बसता मुलांसाठी खंबीरपणे उभी राहिली. एवढेच नाही तर तिने तिला आयुष्यभर विधवेसारखे जगायचे नाही म्हणून नवऱ्याच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी हळदी कुंकू ठेऊन प्रत्येकीला हळदी कुंकू लावून एक एक झाड भेट म्हणून दिले. ती आहे आधारविश्व फाऊंडेशन ची सदस्या लीना निशांत पापळकर या अगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे, निशांत च्या मावशी माया ताजने उपस्थित होत्या. लीना पापडकर यांच्या या निर्णयाचे स्वागत करून आधारविश्व फाऊंडेशन तर्फे त्यांचा शाल आणी रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे यांनी लीनाचे अभिनंदन केले. आपल्या भाषणातून बोलताना म्हणाल्या की जुन्या रूढी परंपरांना फाटा देत विधवांना सुद्धा समाजात सन्मान मिळावा. त्यांना हळदी कुंकू किंवा इतर कार्यापासून दूर ठेऊ नये म्हणून त्या दरवर्षी आधारविश्व फाऊंडेशन तर्फे विधवांसोबत मकर संक्रांत साजरी करतात.पतीचे निधन झाल्यानंतर आयुष्यभर विधवा म्हणून आयुष्य का काढायचे. एखादी स्त्री विधवा झाली की तिला हळदी कुंकू करायला औक्षवान करायला चालत नाही. उलट असे करून आपण तिचे मानसिक खच्चीकरणच करत असतो. खरं तर अश्यावेळेस तिला मानसिक आधाराची जास्त गरज असते.परंतु लीनाने जुन्या रूढीपरंपरांना फाटा देत नवऱ्याच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी एका नवीन विचारला चालना देत लीना ने आलेल्या सर्वांना हळदी कुंकू लावून तुळशीचे एक रोपटे देऊन श्रद्धांजली अर्पण केली.लीनाने घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.आधारविश्व फाऊंडेशन समाजातील अश्या महिलांच्या पाठीशी सदैव एक कुटुंब म्हणून राहील असेही गीता हिंगे बोलल्या. यावेळी आधारविश्व फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा विना जंबेवार, सदस्या विजया मने, कांचन चौधरी, शहनाज शेख, जयश्री चांदेकर, मीरा कोलते, ऐश्वर्या लाकडे,डॉ, वृषाली आप्पलवार, डॉ अंकिता आप्पलवार, लोंढे काकू,छाया नरुले, रुपाली पापळकर,शोभना जोशी, सुरेखा क्षीरसागर इ. महिला सदस्या उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे संचालन आधारविश्व फाऊंडेशन च्या सदस्या विद्या कुमरे यांनी केले.