वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाला वेग देणार
सुधारित खर्चास मान्यता
वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाला वेग देण्यासाठी १ हजार ९६ कोटी इतक्या द्वितीय सुधारित खर्चास आणि राज्य शासनाच्या ५० टक्के आर्थिक सहभागास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार ५४८ कोटी राज्य शासनाच्या हिश्श्याचे असतील. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सध्या या रेल्वे मार्गाची केवळ ७ टक्के भौतिक प्रगती झाली आहे. २०१० या वर्षी प्रकल्पाची किंमत २०० कोटी होती, २०१५ या वर्षी ती ४६९ कोटी झाली. प्रकल्प खर्चात विविध कारणांमुळे वाढ झाली.
या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा मोबदला त्वरित द्यावा तसेच वन विभागाशी संबंधित मुद्दे तातडीने मार्गी लावावेत असे निर्देशही मंत्रिमंडळाने परिवहन विभागास दिले. ३१ मार्च २०२२ पर्यंत केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी २९ कोटी २२ लाख निधी दिला असून राज्य सरकारने १९ कोटी २२ लाख इतका निधी दिला आहे.
—–०—–
आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्यामुळे आरमोरी मतदार संघातील वडसा ते आरमोरी व थेट जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहराला जोडणारा रेल्वे मार्ग असल्याने प्रवासी वाहतूक, माल वाहतुकीसाठी सुलभ सोयीमुळे आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्हाच्या विकासात भर पडेल. याकरिता आमदार कृष्णा गजबे यांनी केंद्र सरकार, राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह वडसा – गडचिरोली रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी सहकार्य करणारे गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री अशोकजी नेते आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांचेही आभार मानले.







