पीक नुकसानाची भरपाई द्या
– शांतीग्राम, तुमरगुंडा, कोलपल्लीतील शेतक-यांची मागणी
मूलचेरा(तालुका प्रतिनिधी)
सन 2017-18 या वर्षांत मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम, तुमरगुंडा, कोलपल्ली हद्दीतील शेतक-यांच्या शेतात विद्युत टॉवर (पोल) बसविण्यात आले. मात्र याचा मोबदला व पीक नुकसान भरपाई अद्यापही देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही भरपाई त्वरित मिळवून द्यावी, अशी मागणी तिन्ही गावातील नुकसानग्रस्त शेतक-यांनी माजी आमदार दीपक आत्राम यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
सन 2017-18 मध्ये मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम, तुमरगुंडा, कोलपल्ली हद्दीतील काही शेतक-यांच्या शेतातून विद्युत टॉवर (पोल) बसविण्यात आले. या कामामुळे शेतक-यांच्या पिकाचे नुकसान झाले. संबंधित विभागाकडून त्या वर्षाची पीक नुकसान भरपाई देण्यात आली. मात्र 2019-2022 पर्यंत पीक नुकसान व टॉवर लावलेल्या जमिनीचा मोबदला अद्यापही देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबीची चौकशी करावी व नुकसानग्रस्त शेतक-यांना मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी तिन्ही गावातील नुकसानग्रस्त शेतक-यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना माजी जिप सदस्य संजय चरडुके, शांतिग्रामचे उपसरपंच श्रीकांत सम्मतदार, संदीप बडगे, कमल बाला, खितिष विश्वास, पुलिंग गाईन, यशवंत तलांडे, कालिदास चौधरी, नामदेव कुसनाके, सुभाष कुसनाके, यशवंत चौधरी उपस्थित होते.
●आठवडाभरात मिळणार भरपाई!
नुकसानग्रस्त शेतक-यांची अडचण लक्षात घेवून माजी आमदार दीपक आत्राम यांनी सर्व शेतक-यांना घेवून 132 केव्हीचे कार्यकारी अभियंता इंगळे यांच्या कार्यालयात जावून याबाबत चर्चा केली. यावेळी अभियंता इंगळे यांनी येत्या आठवडाभरात संबंधित शेतक-यांना नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.