मसूर पिकाच्या बियाणे मिनिकीटचे शेतकऱ्यांना मोफत वाटप

74

*मसूर पिकाच्या बियाणे मिनिकीटचे शेतकऱ्यांना मोफत वाटप*

 

गडचिरोली,(जिमाका) दि.25 : केंद्र शासनाने कडधान्य पिकांमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये तूर, मसूर व उडीद या कडधान्य पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मसूर या पिकाचे कमी होत चाललेले क्षेत्र व उत्पादकता विचारात घेऊन सुधारित वाणांचे बियाणे मिनिकीट वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

भारतीय कृषि अनुसंधान, नवी दिल्ली यांचेमार्फत विकसित करण्यात आलेल्या मसूर पिकाच्या L-4727 या वाणाचे १८१२५ बियाणे मिनिकीट रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले आहेत. मसूर या कडधान्य पिकाचे पोषणमूल्य विचारात घेता एकूण १४५० क्विंटल बियाणे मिनिकीट १९ जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात आले आहेत. हे बियाणे मिनिकीट ८ किलो पॅकिंग साईज मध्ये असून एका बॅगमध्ये अर्धा एकर क्षेत्रावर लागवड करता येते.

मसूर पिकाचा L-4727 हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस करण्यात आलेला नवीन वाण असून यामध्ये प्रथिनांचे प्रमाण २६.४७ % इतके आहे. सदरचा वाण मर रोगास प्रतिकारक आहे तसेच किडींना कमी बळी पडणारा आहे. जमिनीतील ओलाव्यावरही मसूर पिकाच्या या वाणाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे घेता येते. हा वाण साधारणतः ११५ ते १२० दिवसात तयार होत असून, सामान्य परिस्थितीत चांगले पीक व्यवस्थापन केल्यास हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पन्न मिळू शकते. या बियाणे मिनिकीटमुळे ३६२५ हेक्टर क्षेत्र मसूर पिकाच्या लागवडीखाली आले आहे.

 

****