अखेर….अहेरी- व्यंकटापुर बस फेरी सुरू माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या प्रयत्नांना यश
अहेरी:- व्यंकटापूर पर्यंत अहेरी आगाराची बसफेरी सुरू करण्यासाठी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी वेळोवेळी अहेरी आगार व्यवस्थापकांकडे मागणी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून 8 फेब्रुवारी रोजी अहेरी ते व्यंकटापूर बस फेरी सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे या भागातील प्रवाश्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
व्यंकटापूर हे तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आणि प्रसिद्ध बालाजी देवस्थान असलेले हे ठिकाण आहे.मागील काही महिन्यांपासून या रस्त्यावर बसफेरी नसल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.बसफेरी नसल्याने खाजगी वाहनांचा आधार घेऊन आगाऊ पैसे मोजून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता.
या भागातील नागरिकांना तालुका मुख्यालयात शासकीय आणि इतर विविध कामासाठी नेहमीच अहेरी यावे लागते.एढेच नव्हेतर व्यंकटापूर येथे प्रसिद्ध बालाजी मंदिर असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. मात्र अहेरी आगाराची बसफेरी बंद असल्याने अडचण निर्माण होत असल्याची बाब भाग्यश्री ताई आत्राम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अनेकदा भ्रमणध्वनी द्वारे,प्रत्यक्ष भेट देऊन आणि निवेदनाद्वारे बस फेरी सुरू करण्याची मागणी केली होती. 8 फेब्रुवारीपासून सकाळी 10 वाजता आणि दुपारी 02 वाजता असे दोन फेऱ्या सुरू झाल्याने या भागातील लंकाचेन,वट्रा,देवलमरी, आदी गावातील नागरिकांना अहेरी पर्यंतचा प्रवास सुकर झाला आहे.
अहेरी आगारातून वेंकटापूर साठी बस सोडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, इंदरशहा मडावी,मखमुर शेख,बालाजी गावडे, श्याम मडावी, सुमित मोतकुरवार, अनुराग बेझलवार,तिरुपती मडावी तसेच अहेरी आगाराचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.