शहिद जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने उपपोस्टे लाहेरी येथे उभारले शहिद स्मारक

64

 

शहिद जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने उपपोस्टे लाहेरी येथे उभारले शहिद स्मारक

 

पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे हस्ते करण्यात आले अनावरण

 

 

गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून 200 किलोमीटर दुर व छत्तीसगड सिमेलगत असलेल्या अतिदुर्गम अशा उपपोस्टे लाहेरी हद्दीमध्ये दिनांक 08 ऑक्टोंबर 2009 रोजी माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस अधिकारी व 16 जवान शहिद झाले होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून तसेच त्यांचे महान कार्य व देशासाठी केलेले बलिदान इतर पोलीसांपर्यंत व जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता तसेच त्यांच्या कार्याला सतत आठवणीत ठेवून इतर अधिकारी/जवानांना प्रेरणा देण्याकरीता उपपोस्टे लाहेरी येथे शहिद स्मारक उभारण्यात आला. सदर शौर्यस्थळ व शहिद स्मारकाचा अनावरण सोहळा आज दिनांक 08 ऑक्टोंबर 2023 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या हस्ते पार पडला.

सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या हस्ते शौर्य स्थळ व शहिद स्मृती स्मारकाचे रिबीन कापून व दीप प्रज्वलन करुन अनावरण करण्यात आले. त्यानंतर सर्व जमलेल्या मान्यवरांनी शहिद स्मारकास पुष्पगुच्छ अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आम्ही आत्मसमर्पण करणा­या माओवाद्यांचे स्वागत करत आहोत तसेच जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल व माओवाद्यांच्या जाचाला आता घाबरण्याची गरज नसून, गडचिरोली पोलीस दल तुमच्या संरक्षणासाठी व विकासासाठी सदैव तत्पर आहे. तसेच गडचिरोली पोलीस दल आपल्या सर्व अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत करेल. यासोबतच प्रभारी अधिकारी लाहेरी व त्यांच्या संपूर्ण टीमने केलेल्या कार्याचे कौतुक केले.

 

या कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा, मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. यतिश देशमुख सा., सीआरपीएफ बटा. 37 चे कमांडंट श्री. खोब्राागडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. नितीन गणापूरे सा., व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, आश्रम शाळा लाहेरी येथील शिक्षक वृंद व विद्यार्थी, येरकलवार गुरुजी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपपोस्टे लाहेरीचे प्रभारी अधिकारी श्री. संतोष काजळे, पोउपनि. प्रशांत डगवार, पोउपनि. अभिजीत काळे, पोउपनि. सचिन सरकटे व सर्व अंमलदार, सिआरपीएफचे असिस्टंट कमांडंट श्री. अशोक कुमार सा, पोनि. शीतला प्रसाद तसेच एसआरपीएफ ग्रुप 07 चे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.