55

गुढीपाडवा – लेख क्र २  ( मराठी )

 

*गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती*

कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात जाणून घेऊया.

*अभ्यंगस्नान (मांगलिक स्नान)* : गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करतात.

*तोरण लावणे* : स्नानानंतर आम्रपल्लवांची तोरणे सिद्ध करून प्रत्येक द्वाराशी लाल फुलांसहित बांधावी; कारण लाल रंग शुभदर्शक आहे.

*पूजा* : प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्‍वाची निर्मिती केली. पूजेत त्याला दवणा वाहतात. नंतर होमहवन आणि ब्राह्मणसंतर्पण करतात. मग अनंत रूपांनी अवतीर्ण होणार्‍या विष्णूची पूजा करतात. ‘नमस्ते बहुरूपाय विष्णवे नमः ।’, हा मंत्र म्हणून त्याला नमस्कार करतात. नंतर ब्राह्मणाला दक्षिणा देतात. शक्य झाले तर इतिहास, पुराणे इत्यादी ग्रंथ ब्राह्मणाला दान देतात. ही शांती केल्याने सर्व पापांचा नाश होतो, उत्पात घडत नाहीत, आयुष्य वाढते आणि धनधान्याची समद्धी होते, असे सांगितले आहे.’ संवत्सर पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो, आयुष्यवृद्धी होते, सौभाग्याची वाढ होते आणि शांती लाभते. या दिवशी जो वार असेल, त्या वाराच्या देवतेचीही पूजा करतात.

*गुढी उभारणे* : या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून सूर्योेदयाच्या वेळी शास्त्रशुद्ध गुढी उभारली जाते. गुढी सूर्योदयानंतर लगेचच मुख्य द्वाराच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या अंगाला (बाजूला) भूमीवर पाट ठेवून त्यावर उभी करावी. गुढी उभी करतांना तिची स्वस्तिकावर स्थापना करून पुढे थोडीशी कललेल्या स्थितीत उंचावर उभी करावी. सूर्यास्ताच्या वेळी गुळाचा नैवेद्य दाखवून गुढी उतरवावी.

*दान* : याचकांना अनेक प्रकारची दाने द्यावीत, उदा. पाणपोईद्वारा उदकदान. याने पितर संतुष्ट होतात. ‘धर्मदान’ हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे शास्त्र सांगते. सध्याच्या काळात धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे.

*पंचांगश्रवण* : ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा ‘उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात् वर्षफल श्रवण करतात. या पंचांगश्रवणाचे फल सांगितले आहे, ते असे –

तिथेश्‍च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यवर्धनम् । नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ॥

करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफलमुत्तमम् । एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानफलं लभेत् ॥

अर्थ : तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते, वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते, नक्षत्रश्रवणाने पापनाश होतो, योगश्रवणाने रोग जातो, करण श्रवणाने चिंतिले कार्य साधते. असे हे पंचांगश्रवणाचे उत्तम फल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते.’

*कडुनिंबाचा प्रसाद* : पंचाग श्रवणानंतर कडुनिंबाचा प्रसाद वाटायचा असतो. हा प्रसाद कडुनिंबाची पाने, जिरे, हिंग, भिजलेली चण्याची डाळ आणि मध यांपासून सिद्ध करतात.

*भूमी (जमीन) नांगरणे* : या दिवशी भूमीत नांगर धरावा. नांगरण्याच्या क्रियेने खालची माती वर येते. मातीच्या सूक्ष्म कणांवर प्रजापति लहरींचा संस्कार होऊन बीज अंकुरण्याची भूमीची क्षमता अनेक पटींनी वाढते. शेतीची अवजार अन् बैल यांवर प्रजापति लहरी उत्पन्न करणार्‍या मंत्रासह अक्षता टाकाव्या. शेतात काम करणार्‍या माणसांना नवीन कपडे द्यावे. या दिवशी शेतात काम करणारी माणसे अन् बैल यांच्या भोजनात पिकलेला भोपळा, मुगाची डाळ, तांदुळ, पुरण इत्यादी पदार्थ असावेत.

*सुखदायक कृत्ये* : नाना प्रकारची मंगल गीते, वाद्ये आणि पुण्य  पुरुषांच्या कथा ऐकत हा दिवस आनंदाने घालवावा. हल्लीच्या काळी सण म्हणजे मौजमजा करण्याचा दिवस अशी काहीशी संकल्पना झाली आहे; मात्र हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे सण म्हणजे ‘अधिकाधिक चैतन्य मिळवण्याचा दिवस’ असतो. त्यामुळे सणाच्या दिवशी सात्त्विक भोजन, सात्त्विक पोषाख, तसेच अन्य धार्मिक कृत्ये इत्यादी करण्यासमवेतच सात्त्विक सुखदायी कृत्ये करण्यास शास्त्राने सांगितले आहे. सण, धार्मिक विधीच्या दिवशी अन् गुढीपाडव्यासारख्या शुभदिनी नवीन किंवा कौशेय (रेशमी) वस्त्रे आणि अलंकार धारण केल्याने देवतांचे आशीर्वाद लाभतात.वस्त्रांत आकृष्ट झालेल्या देवतांच्या तत्त्व लहरी वस्त्रांमध्ये दीर्घकाळ टिकून रहातात आणि ही वस्त्रे वर्षभर परिधान करणार्‍याला देवतांच्या तत्त्वलहरींचा वर्षभर लाभ होतो.

*गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाची प्रार्थना* : ‘हे ईश्‍वरा, आज तुझ्याकडून येणारे शुभाशीर्वाद आणि ब्रह्मांडातून येणार्‍या सात्त्विक लहरी मला जास्तीतजास्त ग्रहण करता येऊ देत. या लहरी ग्रहण करण्याची माझी कुवत नाही. मी तुला संपूर्ण शरण आलो आहे. तूच मला या सात्त्विक लहरी ग्रहण करायला शिकव’, हीच तुझ्याचरणी प्रार्थना !

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

*संकलन*- श्रीमती विभा चौधरी

*संपर्क*-7620831487