*नागरिक-केंद्रित सुशासनाकडे डिजिटल झेप : ‘जननिवेदन पोर्टल’ व ‘गडचिरोली मित्र’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट कार्यान्वित*
*गडचिरोली जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण ई-गव्हर्नन्स उपक्रम*
गडचिरोली, दि. ३० : नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदणी, शासकीय सेवांची माहिती व अर्जांच्या प्रगतीचा मागोवा घेता यावा, तसेच नागरिक व प्रशासन यांच्यातील संवाद अधिक सुलभ, गतिमान व पारदर्शक व्हावा, या उद्देशाने गडचिरोली जिल्हा प्रशासनाने दोन महत्त्वाचे डिजिटल उपक्रम – ‘जननिवेदन पोर्टल’ आणि ‘गडचिरोली मित्र’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट – कार्यान्वित केले आहेत. मुख्यमंत्री १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाने विकसित केलेल्या या प्रणालींचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अस्मिता मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. किरण मोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गणेश मेश्राम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती ज्योती कडू, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राहुल मोरघडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. सु. श्री. गजभारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. पंडा म्हणाले की, जननिवेदन पोर्टल हे केवळ तक्रार नोंदणीचे साधन नसून नागरिकांच्या अपेक्षांना वेळेत प्रतिसाद देणारी आणि प्रशासनातील उत्तरदायित्वाची कार्यसंस्कृती अधिक बळकट करणारी आधुनिक डिजिटल व्यवस्था आहे. गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक जिल्ह्यात या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक व शासन यांच्यात थेट, जलद व प्रभावी संवाद प्रस्थापित होणार असून सुशासनाच्या दिशेने हा एक नवा आदर्श ठरेल, असे त्यांनी नमूद केले व नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
*जननिवेदन पोर्टल : कागदाधारित व्यवस्थेला डिजिटल पर्याय*
मुख्यमंत्री १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जनतेच्या तक्रारींचा विहित कालमर्यादेत निपटारा व्हावा, यासाठी जननिवेदन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या टपाल-आधारित कागदोपत्री पद्धतीऐवजी आता तक्रार नोंदणीपासून अंतिम निवारणापर्यंतची प्रक्रिया तंत्रज्ञानाधारित, वेळबद्ध व मागोवा घेण्यायोग्य झाली आहे.
नागरिकांनी तक्रार नोंदविण्यासाठी https://gadchirolicollector-nivedan.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करावा. संबंधित तालुका व विभाग निवडून मोबाईल क्रमांक व आवश्यक माहिती भरल्यानंतर तक्रार सादर करता येते. आवश्यक असल्यास छायाचित्रे किंवा कागदपत्रे (पीडीएफ/जेपीईजी) अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तक्रार नोंदणी झाल्यानंतर नागरिकांना युनिक आयडी प्राप्त होतो, ज्याच्या आधारे तक्रारीची सद्यस्थिती व प्रगती सहजपणे पाहता येते.
या पोर्टलवर जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयांचे डिजिटल मॅपिंग करण्यात आले असून तक्रार संबंधित कार्यालयात त्वरित पोहोचते. संबंधित अधिकाऱ्यांच्या लॉगिनमध्ये तक्रार तत्काळ उपलब्ध होत असून निवारण प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची नोंद प्रणालीमध्ये केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांसाठी उपलब्ध रिअल-टाईम नियंत्रण फलक प्रणालीमुळे एकूण तक्रारी, प्रलंबित प्रकरणे, विभागनिहाय कामगिरी व विलंबाची कारणे थेट पाहता येणार असून, वरिष्ठ स्तरावरून प्रभावी देखरेख व वेळेत हस्तक्षेप करणे शक्य होणार आहे.
*‘गडचिरोली मित्र’ – नागरिकांच्या सेवेत व्हॉट्सअॅप चॅटबॉट*
नागरिकांना विविध शासकीय योजना, विभागनिहाय सेवा, वेगवेगळी पोर्टल्स व हेल्पलाईन क्रमांकांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ‘गडचिरोली मित्र’ हा व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू केला आहे. हा चॅटबॉट २४x७ कार्यरत असून नागरिकांनी अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक 9423562243 वर “Hi” असा संदेश पाठवल्यानंतर संबंधित सेवांबाबत मार्गदर्शन मिळते.
या चॅटबॉटच्या माध्यमातून तक्रार नोंदणी, विविध शासकीय योजनांची माहिती, विभागनिहाय सेवा, महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक, माहितीचा अधिकार (RTI), सेवा हमी कायदा २०१५ अंतर्गत सेवा तसेच डिजिटल ७/१२ यांसारख्या सुविधांची माहिती थेट व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होते. यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम व अनावश्यक धावपळ वाचून शासनाच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांसाठी जननिवेदन पोर्टलच्या वापराबाबत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील 102 कार्यालयांची नोंदणी या पोर्टलवर झाली असून उर्वरित कार्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक कार्यालयाने समन्वयक नेमून तक्रारींच्या दैनंदिन कार्यवाहीची नियमित अद्ययावत नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांनी ‘जननिवेदन पोर्टल’ आणि ‘गडचिरोली मित्र’ या दोन्ही डिजिटल उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी केले. या उपक्रमांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख, पारदर्शक व तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासनाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले असल्याचे त्यांनी नमूद केले.





