एस टी डेपो मध्ये कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा उत्सव डीजे लावून नाच धिंगाणा घालून साजरा…
गडचिरोली:गडचिरोली शहरातील एस टी डेपो येथील आतील परिसरात एका कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीवर आनंद साजरा करण्यासाठी एस टी विभागातील कर्मचाऱ्यांनी जवळ पास एक ते दीड तासापर्यंत मोठ्या आवाजात डिजे वाजवून नाच धिंगाणा घातल्याची घटना उघडकीस आली.
या घटनेची सविस्तर माहिती घेतली असता एस टी विभागातील आगार उपाध्यक्ष संतराज रामचंद्र कलिये यांचा 58 वा वाढदिवस आणि सेवानिवृत्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी एस टी डेपो येथील कामगार संघटनेच्या वतीने मोठ्या आवाजात डिजे वाजवून नाच धिंगाणा घालण्यात आला होता. सेवानिवृत्तीचा आनंद अशा पद्धतीने साजरा करून सर्व सामान्य माणसाच्या कानठळ्या फोडणाऱ्या डिजे साउंड ची कर्कश आवाज मुख्य रस्त्यावरील तहसील आणि पंचायत समितीच्या कार्यालयात ऐकू येत होती.या व्यतिरिक्त काही कर्मचारी तर कामावर कार्यरत असतांना सुध्दा फलाटावर गाड्या लावून व शाळेच्या विद्यार्थ्यांना व प्रवाश्यांना ताटकळत ठेवून नाचण्यात व्यस्त झालेले होते.
या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी डेपो प्रबंधक अतुल रामटेके आणि जिल्हा नियंत्रक अशोक वाढीभस्मे यांना मोबाईल वर संपर्क केला असता त्यांनी आपला फोन उचललेला नाही.या व्यतिरिक्त डीटीओ पदावर असलेले व्यवहारे यांना मोबाईल वर एस टी डेपो परिसरात कर्मचाऱ्यांनी कर्कश आवाजात डिजे वाजवून नाच धिंगाणा केल्याची माहिती विचारली असता त्यांनी माहिती घेतो असे सांगितले.
या घटनेच्या वेळी एस टी डेपो परिसरात नियुक्त असलेल्या सुरक्षा रक्षकांना विचारले असता त्यांनी असा प्रकारे डेपो परिसरात डिजे वाजवून होणारा नाच धिंगाणा आम्ही आज पर्यंत कुठल्याही एस टी डेपो मध्ये पाहिलेला नाही अशी केविलवाणी प्रतिक्रिया दिली.
अशा प्रकारे विभत्स प्रकारे डिजे वाजवून नाच धिंगाणा घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एस टी विभाग कोणती कारवाई करणार यावर शहरातील लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.