पंचायत समितीच्या आमसभेत अव्यवस्था; गटविकास अधिकाऱ्यांचा भाकपाकडून निषेध

24

# पंचायत समितीच्या आमसभेत अव्यवस्था; गटविकास अधिकाऱ्यांचा भाकपाकडून निषेध

 

एटापल्ली :

३० सप्टेंबर २०२५ रोजी पंचायत समिती एटापल्ली येथे झालेल्या वार्षिक आमसभेत प्रचंड अव्यवस्था पाहायला मिळाली. नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागल्याने भारतीय कम्युनिस्ट पार्टीने गटविकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांचा तीव्र निषेध नोंदविला आहे.

 

आमसभेत नागरिक आपली समस्या मांडत असताना ध्वनीव्यवस्था निकृष्ट असल्यामुळे कुणालाही कुणाचे बोलणे स्पष्टपणे ऐकू आले नाही. तसेच पंखे काही चालू तर काही बंद असल्याने उकाड्याने नागरिकांना बसणे कठीण झाले. याशिवाय मंचावर मान्यवरांसाठी सुका मेवा पुरविण्यात आला; मात्र सामान्य नागरिकांना जागेवर आणून नाश्ता वा पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.

 

यापूर्वीच भाकपाकडून प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे अशा गैरसोयी टाळण्यासाठी पूर्वसूचना दिली होती. तरीदेखील आवश्यक ती तयारी करण्यात आली नाही, अशी तीव्र टीका करण्यात आली आहे. या निष्काळजीपणाची संपूर्ण जबाबदारी गटविकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांच्यावर येते, असे भाकपाने स्पष्ट केले आहे.

 

भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी निवेदनाद्वारे सांगितले की, “आमसभेतील ही अवस्था ही जनतेच्या अपमानास्पद वागणुकीचे उदाहरण असून, याचा निषेध आम्ही नोंदवित आहोत.”