*सिरोंचा येथील वाळू विक्री शासनाच्या नियमानुसार*
– खनिकर्म अधिकारी
गडचिरोली दि .१: ‘अंकिसा परिसरात रेती माफियांचा धुमाकूळ’ आणि ‘सिरोंचा तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस’ या शीर्षकांच्या बातम्यांचे खंडन करतांना जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान खा. शेख यांनी स्पष्ट केले आहे की, सदर वृत्त पूर्णतः अयोग्य, दिशाभूल करणारे आणि तथ्यहीन असून, त्याचा प्रत्यक्ष परिस्थितीशी कोणताही संबंध नाही.
*वाळू विक्रीबाबतची वस्तुस्थिती*
खनिकर्म अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की, सिरोंचा तालुक्यातील वाळू विक्री शासन परवानगीनुसार व नियमांनुसार सुरू आहे.
अंकिसामाल (ता. सिरोंचा) येथील स.क्र. 690, 691 मधील 2186 ब्रास आणि स.क्र. 908 मधील 7972 ब्रास रेतीसाठा विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे गौण खनिज विक्रेता मंजूर करण्यात आलेला आहे.
तसेच, मद्यिकुंटा (ता. सिरोंचा) येथील स.क्र. 533 मधील 21520 ब्रास मातिमिश्रित वाळू निष्कासन (उत्खनन) आणि वाहतुकीची परवानगी शेतजमीन लागवडीयोग्य करण्याच्या हेतूने शासन मान्यतेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेली आहे.
या साठ्यातील रेती मौजा अंकिसा येथे साठवण्यात आली असून, तेथून शासन नियमांनुसार नियमित विक्री केली जात आहे.
हा संबंधित रेती साठा खाजगी व्यक्तीच्या जमिनीत करण्यात आला असून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शासन महसुलाचे संरक्षण सुनिश्चित केले आहे.
यामुळे, ‘अंकिसा परिसरात रेती माफियांचा धुमाकूळ’ आणि ‘सिरोंचा तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस’ असा उल्लेख चुकीचा व दिशाभूल करणारा आहे.
*नदीपात्रातून उत्खनन शक्य नाही*
सध्या सिरोंचा तालुक्यात प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांना पूरपरिस्थिती आहे. यामुळे नदी प्रवाहातून रेती उत्खनन करणे शक्यच नाही, अशा परिस्थितीत अवैध उत्खनन होत असल्याचे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे.
*प्रशासनाची कारवाई व उपाययोजना*
प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने तत्काळ पाऊले उचलली आहेत:
उपविभागीय अधिकारी, अहेरी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली यांना प्रत्यक्ष चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे कळविले आहे.
आवश्यकतेनुसार MRSAC नागपूर यांच्याकडील प्रणालीद्वारे देखील देखरेख केली जाईल.
गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक होऊ नये याकरिता सिरोंचा तालुक्यात दोन गौण खनिज चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.