जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
आरक्षण सोडतीकडे जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे लागले लक्ष
गडचिरोली – येत्या नोव्हेंबर, डिसेंबर महिण्यात होऊ घातलेल्या जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. या संदर्भात आज १ ऑक्टोबर रोजी राज्य निवडणुक आयोगाने आदेश काढले आहेत. यामुळे आता आरक्षण सोडतीकडे जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहेत.
स्थानीक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परीषदचे गट व पंचायत समितीचे गण यांची प्रभाग रचना काही दिवसापुर्वी जाहीर करण्यात आली होती.
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राम विकास विभागाकडील दि. १२ जून २०२५ रोजीच्या आदेशान्वये सर्व संबंधित ३२ जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून संबंधित ३२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ३३६ पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम देण्यात आला. सदर प्रभाग रचना कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हा कार्यालयाकडून जिल्हा
परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांची अंतिम प्रभाग रचना दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.
आता निवडणुकीकरिता सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आदेशातील सूचना तसेच आरक्षण निश्चित करण्याबाबतच्या कार्यक्रमानुसार सर्व संबंधित जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी विहित कालावधीत आरक्षण अंतिम
करण्याबाबतची कार्यवाही करावी असेही राज्य निवडणुक आयोगाने आपल्या आदेशात नमुद केले आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातीलप्रस्ताव तयार करुन विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्याचा कालावधी ६ ऑक्टोबरपर्यंत आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांनी मान्यता देण्याचा कालावधी ८ ऑक्टोबरपर्यंत निश्चित केला आहे. आरक्षण सोडतीची सूचना जिल्हाधिकारी यांनी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्याचा कालावधी १० ऑक्टोबर आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) बाबत जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी हे १३ ऑक्टोबर रोजी सोडत काढतील तसेच पंचायत समिती निर्वाचक गणासाठी तहसीलदार १३ ऑक्टोबर रोजी सोडत काढतील. १४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिध्द करतील. जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी १४ ते १७ ऑक्टोबर असा आहे. प्राप्त प्रारुप आरक्षणावरील हरकती व सूचना आधारे अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करण्याचा कालावधी २७ ऑक्टोबरपर्यंत आहे. विभागीय आयुक्त हे ३० ऑक्टोबर रोजी आरक्षण अंतिम करतील व जिल्हाधिकारी हे ३ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करतील.