*गडचिरोलीतील ‘मुक्तीपथ’ अभियानाचा देशाला आदर्श*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनातून साकारले अभियान*
मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य टोकाला असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू आणि दारूमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुक्तीपथ’ अभियानाने संपूर्ण देशात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या अभियानामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १५०० गावापैकी ७१० (४७%) गावात दारूविक्री पूर्णपणे बंद आहे.
जनतेच्या मागणी नुसार गडचिरोली जिल्ह्यात १९९३ ला शासनाने दारूबंदी लागू केली. सुगंधित तंबाखू सेवनाचे प्रमाण सुद्धा मोठे होते. कायद्याची अंमलबजावणी अधिक व्यापक करणे हेतु सर्च संस्थेच्या प्रस्तावानुसार २०१६ मधे तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांनी या अभियानाला हिरवी झेंडी दाखवली व हे काम जिल्ह्यात प्रशासन व सर्च संस्था यांचे द्वारा सुरू झाले.
या अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यगटाचे अध्यक्ष मा. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस असून प्रख्यात समाजसेवक डॉ. अभय बंग हे सल्लागार आहेत. जिल्हासमितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहे. पोलिस अधीक्षक व सीइओ जिल्हा परिषद हे जिल्हा समितीचे प्रमुख सदस्य असून जिल्हा शल्य चिकीत्सक हे सचिव आहे. जिल्हा पातळीच्या विविध शासकीय विभागाचे प्रमुख जसे शिक्षण, अन्न व औषधी, उत्पादन शुल्क, आरोग्य, हे समितीचे सदस्य आहे. या अभियानाने व्यापक जनजागृती, गावाचा दारू बंद करण्याचा सामुहिक निर्णय व अहिंसक कृती द्वारा दारू व तंबाखूमुक्ती, शासकीय विभागाद्वारा बंदीची सक्रिय अंमलबजावणी व व्यसनीसाठी व्यसनउपचार या चार पद्धतीचे एक आदर्श मॉडेल तयार केले आहे.
पूर्ण जिल्ह्यातील दारू सेवनाच्या प्रमाणात ३५ टक्के व तंबाखू सेवनाच्या प्रमाणात २५ टक्के अशी लक्षणीय घट झाली आहे. या परिणामातून मागील ९ वर्षात ५५१०२ पुरुषांनी दारू पिणे थांबवले आहे. जिल्ह्यात विषारी दारू पीवून मृत्यूचे प्रमाण शून्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या दृढ समर्थनाने या अभिनव आणि व्यापक अभियानाची फलश्रुती गडचिरोली जिल्ह्यात दिसून येत आहे. दारू व तंबाखूमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेले ‘मुक्तीपथ’ अभियान राज्यासाठी निश्चितच पथदर्शी ठरणार आहे. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे वर्ष २०२४-२५ या वर्षात जिल्ह्यात अवैध दारू वरील होणाऱ्या खर्चामध्ये ६२.९ कोटी बचत झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच तंबाखू सेवनावरील खर्चात १०३.१ कोटी रुपये वाचले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यामध्ये एकूण १६६ कोटी रुपयांची बचत झाली आहे. अशी बचतीची ही विलक्षण योजना आहे.
या अभियानाचा गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १००० गावांमध्ये दारूमुक्ती आणि व्यसनमुक्तीमध्ये मोठा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. या अभियानात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असून ६५२ गावात, महिला सदस्य असलेल्या शक्तिपथ संघटना गठित होऊन, महिला संघटित झाल्या आहे. या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. गडचिरोली पोलिस विभाग सुद्धा यासाठी करत असलेल्या दारूबंदी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांची पाठ थोपटली आहे. दर तीन महिन्याला पोलिस अधीक्षक यांचे अध्यक्षतेत १२ ही तालुक्याचे पोलिस निरीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व मुक्तिपथ प्रकल्प संचालक व प्रमुख कार्यकर्ते यांची आढावा बैठक होऊन अवैध दारूवरील कारवाईचे नियोजन केल्या जाते. गुप्त माहितीच्या आधार पोलिस अवैध दारू नियंत्रणसाठी कारवाई करत आहे. २०२५ या चालू वर्षात १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत अवैध दारू विक्री नियंत्रण करिता एकूण छापे २१०८ टाकून संबधित दारूविक्रेत्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकूण रु. ६८,६६,२४५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गावात अवैध दारू विरुद्ध तक्रारी आल्यास गावात पोलिसांद्वारे कारवाई केली जात आहे. गावातील महिलांनी पोलिस स्टेशन पर्यन्त येऊन गावातील अवैध दारूविक्री बंदीसाठी मदत घ्यावी, महिलांची हिम्मत वाढावी, यासाठी दरवर्षी राखी विथ खाकी असा महिलांनी पोलिस बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये साजरा केला जातो. गडचिरोली पोलीस भविष्यातही हे कार्य अशाच प्रकारे पुढे चालू ठेवतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. सीईओ जिल्हा परिषद हे शिक्षणाधिकारी व मुक्तिपथ कार्यकर्ते यांचे द्वारा नियोजन करून तंबाखूमुक्त शाळा निर्माण करणे हेतु कृती करत आहे, मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती केली जात आहे. पोलिस व अन्न औषध प्रशासन द्वारा सुगंधित तंबाखूचे ठोक विक्रेतावर कारवाई करणे सुरू आहे.
नक्षलग्रस्त, अविकसित हा कलंक पुसण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात नशामुक्तीसाठी अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करीत असतांना जिल्ह्यातील तरुण हा व्यसनांना बळी न पडता सशक्त आणि निरोगी राहण्यासाठी या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासी गावात ग्रामसभा, गावसभा होऊन मादक द्रव्य नियंत्रण करिता प्रयत्न सुरू आहे. २०२४-२५ या वर्षात २५८ ग्रामसभा व १२ इलाकासभेमध्ये मादक द्रव्य नियंत्रण विषयाची मांडणी करण्यात आली.
जिल्ह्यात ‘मुक्तीपथ’ अभियान आणि दारूबंदीची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे झाली व सुरू आहे. हे कार्य लोककेंद्रित असून, यामध्ये समाजातील अनेक घटकांचा सक्रिय सहभाग मिळाला आहे. भारत देशामधे अशा पध्दतीने होणारे हे पहिले अभियान असून निश्चितच संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरणारे असेल.