*समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय यशाकडे टप्पा*

64

*समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय यशाकडे टप्पा*

*कॅरम व कुस्ती स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे वर्चस्व*

 

गडचिरोली, दि. ९ ऑक्टोबर (जिमाका):

समाज कल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. विभागीय स्तरावरील कॅरम व कुस्ती स्पर्धांमध्ये तब्बल आठ विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

 

*राज्यस्तर कॅरम स्पर्धेकरिता ७ विद्यार्थ्यांची निवड*

दिनांक ९ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पब्लिक स्कूल, वांगेपल्ली (ता. अहेरी) येथील सात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर प्रवेश मिळविला. 14 व 17 या दोन्ही गटांमध्ये या विद्यार्थ्यांनी अचूक खेळ सादर करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

या विजेत्यांमध्ये प्रफुल दुर्गम, धम्मरत्न दुर्गे, महेंद्र गड्डी, अश्विन कुम्मरी, निशांत कुमरी, सुशांत अट्टेल व कार्तिक दुर्गम यांचा समावेश आहे.

 

*कुस्ती स्पर्धेत वरुण दुर्गमचे दमदार यश*

 

दरम्यान, समाज कल्याण विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज पब्लिक स्कूल, नवेगाव (जि. गडचिरोली) येथील वरुण दुर्गम या विद्यार्थ्याने दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला.

वरुणला कसलेही व्यावसायिक प्रशिक्षण नसतानाही आपल्या चिकाटी व मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले. यावर्षी पहिल्यांदाच समाज कल्याण विभागाच्या शाळेने कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला आणि तब्बल ९ विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले, त्यापैकी ५ विद्यार्थी अंतिम फेरीत पोहोचले. वरुणने त्यामधून अव्वल स्थान पटकावत राज्यस्तरावर प्रवेश मिळविला.

विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियांका डांगेवार मुख्याध्यापक श्री. आंबीलकर, क्रीडा शिक्षक यश पडेलवार तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

000