*ग्रामीण प्रगतीसाठी बँकांची भूमिका महत्त्वाची – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*
*बँक ऑफ इंडिया, आष्टी शाखेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन*
गडचिरोली, दि. ९ ऑक्टोबर (जिमाका) : कर्जपूरवठ्यातून ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधण्यात बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना गृहकर्ज, शिक्षणकर्ज, कृषी व उद्योग क्षेत्राशी संबंधित कर्ज योजनांचा लाभ सहज आणि सुलभपणे उपलब्ध करून देणे हे सर्व बँकांचे प्राथमिक उद्दिष्ट असावे, असे मत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्यक्त केले.
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे बँक ऑफ इंडिया च्या १४ व्या शाखेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. मुख्य महाप्रबंधक प्रमोद कुमार त्रिवेदी (पुणे), जिल्हा बँक अग्रणी प्रशांत धोंगडे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, बँकांनी एकसमान कागदपत्र प्रणाली विकसित करून सर्व लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी जलद गतीने द्यावी, जेणेकरून रोजगारनिर्मिती व स्थानिक उद्योगविकासाला चालना मिळेल.
*गडचिरोलीत उद्योगविकासाच्या नव्या संधी*
जिल्हाधिकारी पंडा यांनी गडचिरोली जिल्ह्यात अनेक मोठ्या औद्योगिक गुंतवणुकींचे मार्ग खुले झाल्याचे सांगत जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्ती, खनिजसंपदा आणि कृषीपूरक साधनांचा उपयोग करून स्थानिक युवकांना उद्यमशीलतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता नमूद केली.
त्यांनी जनधन खाते उघडणे, जीवनज्योत आणि सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, तसेच निष्क्रिय खात्यांचे पुनरुज्जीवन याबाबत नागरिकांना जागरूक करण्यासाठी बँकांनी विशेष मोहिमा आयोजित कराव्यात, अशा सूचना दिल्या. तसेच आरबीआयच्या निष्क्रिय खात्यांतील रक्कम पुनर्प्राप्त करण्याबाबतही जनजागृती करण्याचे आवाहन केले.
मुख्य महाप्रबंधक प्रमोद कुमार त्रिवेदी (पुणे) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आष्टी शाखा ही गडचिरोली जिल्ह्याच्या बँकिंग सेवेचा मानाचा तुरा ठरेल. आसपासच्या तीस गावातील नागरिकांनी कृषी, उद्योग, शिक्षण आणि गृहविकासासाठी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. बँक ऑफ इंडिया सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी वचनबद्ध असून, ग्रामीण व शेतकरी वर्गाला कमी व्याजदरात कर्ज सुविधा देणे हे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी जयनारायण, आंचलिक प्रबंधक (नागपूर) यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी ज्ञान रंजन दास, आंचलिक प्रबंधक (नागपूर), तसेच आष्टी येथील विविध बँकांचे अधिकारी, ग्रामस्थ व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.