क्रीडा व कलेमधूनच पुढील सक्षम पिढी निर्माण होऊ शकते : सुशील हिंगे 

33

क्रीडा व कलेमधूनच पुढील सक्षम पिढी निर्माण होऊ शकते : सुशील हिंगे

वृत्तवानी गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २३ : आपल्या विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा प्रवृत्ती जागृत झाली तर पुढील जीवनात कुठल्या ही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती निर्माण होते, मुलांमध्ये खिलाडू व कलात्मक वृत्ती जागृत झाली, तर जीवन जगण्यासाठी हिंमत तयार होते, असे प्रतिपादन विश्व हिंदू परीषदेचे जिल्हाध्यक्ष सुशील हिंगे यांनी केले.

बोदली पंचायत समितीअंतर्गत मेंढा येथे केंद्र स्तरीय शालेय बाल क्रीडा व कला केंद्राच्या तीन दिवसीय संमेलनाचा भव्य समारोपीय सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात मार्गदर्शन करताना सुशील हिंगे बोलत होते. गडचिरोलीजवळील मेंढा बोदली येथे बोदली केंद्राअंतर्गत सुरू असलेल्या केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाचा समारोप उत्साहात झाला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आपले कौशल्य सादर केले. या संमेलनात प्राथमिक गटातील प्राविण्य चषक मेंढा शाळेने, तर माध्यमिक गटातील प्राविण्य चषक बोदली शाळेने पटकावला. विजेत्या संघांना आकर्षक शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप भुरले होते. प्रामुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परीषदेचे जिल्हाध्यक्ष सुशील हिंगे, सरपंच वैशाली चचाने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत कुनघाडकर, प्रखंड मंत्री अनुप आसाटी, डॉ. तृप्ती मावळे, बोदलीचे केंद्र प्रमुख दीपक कोरेवार, मुख्याध्यापक ताराचंद आकारे, आचित ठाकूर, पल्लवी गावतुरे, गोपाल मांदाळे तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. संचालन संजय करकाडे यांनी केले. कार्यक्रमाचा अहवाल अमरदीप भुरले (सचिव) यांनी सादर केला. आभार मेंढा शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी कोंडकावार यांनी मानले. या क्रीडा संमेलनासाठी मेंढा शाळेतील कल्पना लाडे, जयश्री कोवासे, नवलू गावळे, आयुष लटारे तसेच गावातील सर्व स्वयंसेवकांनी सहकार्य केले. या तीन दिवसीय संमेलनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कला गुणांना व्यासपीठ मिळाले असून सर्वत्र कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.

———————————