पोलीस भरतीच्या युवकांसाठी यावर्षी ‘जीडीपीएल’ स्थगित, लॉयड्स मेटलचा निर्णय

15

पोलीस भरतीच्या युवकांसाठी यावर्षी ‘जीडीपीएल’ स्थगित, लॉयड्स मेटलचा निर्णय

 

गडचिरोली : स्थानिक तरुणांच्या करिअरच्या आकांक्षांना सर्वोच्च प्राधान्य देत ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ने (LMEL) या वर्षासाठी ‘गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग’ (GDPL) हे क्रिकेटचे सामने स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्हा स्टेडिअमवर या सामन्यांची तयारी सुरू होती, त्या स्टेडिअमवर पोलीस भरतीसाठी इच्छुक युवक-युवतींच्या सरावात अडथळे येण्याची शक्यता होती. ही बाब लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नेतृत्वाने लक्षात आणून दिल्यानंतर त्याची दखल लॅायड्स प्रशासनाने घेतली. आधी तरुणांचे करिअर महत्वाचे असल्याचे सांगत कंपनीने यावर्षी ‘जीडीपीएल’चे दुसरे सत्र स्थगित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

 

अनेक तरुण-तरुणी आपल्या शारीरिक क्षमता चाचणीच्या तयारीसाठी आणि सरावासाठी याच मैदानावर अवलंबून आहेत. स्पर्धेच्या वेळापत्रकामुळे तरुणांच्या या सरावात अडथळा निर्माण होऊन त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन लॉयड्सने समाजहितासाठी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या निर्णयावर आपले मत व्यक्त करताना लॅायड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन म्हणाले की, हा निर्णय आम्हाला ‘जड अंतःकरणाने’ परंतु स्पष्ट उद्दिष्टे समोर ठेवून घेतला आहे. गडचिरोलीकरांना राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामन्यांचा अनुभव देण्यासाठी जीडीपीएलला एक मोठे व्यासपीठ बनवण्याचे आमचे स्वप्न होते. मात्र, आमच्या स्थानिक तरुणांची स्वप्ने आणि त्यांचे करिअर आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. पोलीस भरतीसाठी हे तरुण याच मैदानावर किती मेहनत घेत आहेत, याची आम्हाला कल्पना आली. वास्तविक कपिल देव आणि मिका सिंग यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीत होणारा जीडीपीएलचा भव्य सोहळा स्थगित करणे वेदनादायी असले, तरी तरुणांच्या व्यावसायिक भविष्याशी आम्ही तडजोड करू शकत नाही, असे प्रभाकरन यांनी स्पष्ट केले.

 

विशेष म्हणजे लॉयड्सने या स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक परवानग्या आधीच मिळवल्या होत्या. तसेच पायाभूत सुविधा, नियोजन आणि सेलिब्रिटींच्या करारावर मोठी गुंतवणूकही केली होती. मात्र त्या खर्चाचा विचार न करता, कंपनीने युवकांच्या दीर्घकालीन हिताला प्राधान्य दिले आहे.

 

या हंगामासाठी स्पर्धा स्थगित केली असली, तरी गडचिरोलीतील क्रीडा विकास आणि सामाजिक कल्याणासाठी लॉयड्स कंपनी सदैव कटिबद्ध राहील, असे लॉयड्स व्यवस्थापनाने स्पष्ट केले. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत गडचिरोलीच्या प्रगतीसाठी आपले योगदान सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार कंपनीने केला आहे.