*ढेकणी परसबागेतील भाजीपाल्यांचा समावेश मध्यान्ह भोजनात*

35

*ढेकणी परसबागेतील भाजीपाल्यांचा समावेश मध्यान्ह भोजनात*

माझी शाळा – माझा उपक्रम, माझी शाळा – माझा अभिमान या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ढेकणी येथे परसबाग विकसित करण्यात आली असून या परसबागेतील भाजीपाल्यांचा समावेश आता विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनामध्ये करण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ताजी, पोषक आणि रसायनमुक्त भाजी उपलब्ध होत असून, शालेय परिसर स्वच्छ-सुंदर राहण्यासही मदत झाली आहे. परसबागेत विद्यार्थ्यांच्या सहभागातून पालक, मेथी, कोथिंबीर, चवळी भाजी,भेंडी, वांगी, टोमॅटो, मिरची, दोडका, भोपळा, कारली,शेवगा, कांदा, लसूण,मुळा, गाजर, बटाटा, फुलकोबी, नवलगोल, मोहरी, मका, आंबाडी, चवळी शेंग, वालशेंग, हरभरा, तूर,पपई, तुळस आदी विविध भाज्या पिकविण्यात येत आहेत.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वतः बियाणे पेरणे, पाणी देणे, तण काढणे आणि सेंद्रिय खतांचा वापर करणे या सर्व प्रक्रियेत सहभागी होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, जबाबदारीची जाणीव तसेच नैसर्गिक शेतीबद्दलची आवड निर्माण होत आहे.

शाळेचे मुख्याध्यापक राजेश्वर मुलकलवार यांनी सांगितले की, “या परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रत्यक्ष अनुभवातून दिली जात आहे.” ” शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन मट्टामी यांच्या म्हणण्यानुसार परसबाग शिक्षण, पर्यावरण आणि स्वावलंबन यांचा जिवंत संगम आहे. ” तसेच उपाध्यक्ष सुखदेव कुमोटी यांनी परसबाग या उपक्रमामुळे शाळेला “माझी शाळा – माझा अभिमान” या संकल्पनेला खर्‍या अर्थाने नवे रूप मिळाले आहे असे मत व्यक्त केले. परसबाग व्यवस्थापन याकडे मुख्याध्यापक राजेश्वर मुलकलवार यांच्या मार्गदर्शनात अंगणवाडी सेविका सुमित्रा कुमोटी, उमेद टीम व बचत गट ढेकणी यांचे विशेष लक्ष आहे.