*खनिज क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी पोषणाची हमी;*
*जिल्हा क्षयरोग कार्यालय व ‘उमेद’ यांच्यात ‘फुड बास्केट’ पुरविण्यासाठी सामंजस्य करार*
गडचिरोली, दि. २३: खनिज क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्षयरोग (टीबी) रुग्णांच्या आरोग्य सुधारणा व पोषणासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय आणि ‘उमेद’ (एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प) यांच्यात आज महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार संबंधित क्षयरोग रुग्णांना दररोज फूड बास्केट पुरविण्यात येणार असून हा करार तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे.
हा फूड बास्केट पुरवठा ‘कोया जंगम’ महिला शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी येणारा संपूर्ण खर्च जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्यामार्फत करण्यात येणार असल्याने रुग्णांवर कोणताही आर्थिक भार येणार नाही.
आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, ‘उमेद’कडून एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर, ‘कोया जंगम’ महिला शेतकरी उत्पादन कंपनीच्या संचालिका श्रीमती संध्या गेडाम व श्रीमती सुनीता शेंडे, तसेच खनिज प्रतिष्ठानचे डॉ. तारीक उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या फूड बास्केटमध्ये धान्ये, ज्वारी-भाजरीसारखी भरड धान्ये, विविध डाळी, वनस्पतीजन्य खाद्यतेल, दुधाची भुकटी, दूध, भुईमूग, अंडी आदी पोषणमूल्यांनी परिपूर्ण साहित्याचा समावेश राहणार आहे. क्षयरोग रुग्णांच्या उपचारांसोबतच त्यांचे पोषण सुधारावे, आजारावर मात करण्याची क्षमता वाढावी आणि उपचारांचा अपेक्षित परिणाम साधता यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महिलांच्या शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत फूड बास्केट पुरवठा केल्याने महिला सक्षमीकरणालाही यातून चालना मिळणार असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्थैर्य वाढीस मदत होणार आहे.








