*महिला दिनी वडसा येथे भव्य विधी सेवा प्राधिकरण शिबिर*
*जिल्हाधिकाऱ्यांकडून नियोजनाचा आढावा*
गडचिरोली, (जिमाका) दि. 10 : येत्या 8 मार्च रोजी वडसा येथे होणाऱ्या विधी सेवा प्राधिकरण शिबिरात शासनाच्या विविध योजना व सेवा, बचत गटांचे उपक्रम, महिला व बालकल्याण विषयक माहिती तसेच ‘उमेद’ अंतर्गत स्टॉल अधिक संख्येने उभारण्याचे व 8 मार्च हा जागतिक महिला दिन असल्याने कार्यक्रमस्थळी महिला दिन साजरा करत महिलाभिमुख उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्याचे व हे शिबिर नागरिकांसाठी अधिकाधिक उपयुक्त ठरेल, अशा सर्वसमावेशक नियोजनावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या.
विधी सेवा प्राधिकरण शिबिराच्या प्रभावी आयोजनासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे व्यवस्थापक वसिम खान, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, वडसा उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत शिबिराचे आयोजन वडसा येथील क्रीडा संकुलात करण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडा संकुलात उपलब्ध असलेल्या प्रशस्त जागेमुळे जास्तीत जास्त स्टॉल उभारता येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्टॉलसाठी जागेची निवड करून प्रत्येक स्टॉलचे मोजमाप ठरवून नियोजन करण्यास सांगण्यात आले, जेणेकरून अधिकाधिक स्टॉल उभारता येतील. स्टॉल परिसरात वीज, पाणी, इंटरनेट यांसह आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. शासकीय व सहकारी बँकांकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, आधार कार्ड नोंदणी व केवायसी अद्ययावत करण्यासाठी स्वतंत्र स्टॉल उभारून इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याचेही निर्देश देण्यात आले.
वडसा येथे शिबिरादरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित राहणार असल्याने शासकीय विश्रामगृहाची व्यवस्था नीटनेटकी करने, कार्यक्रमपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करणे, तसेच सर्व संबंधित विभागांना आवश्यक पत्रव्यवहार वेळेत करणे, कार्यक्रमस्थळी ॲम्बुलन्स, अग्निशमन वाहन, पिण्याचे पाणी, मोबाईल शौचालये उपलब्ध ठेवणे, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरुस्ती व स्वच्छता करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.









