गडचिरोलीत उपोषणाची रणधुमाळी — प्रकृती खालावली तरी महिलांचा निर्धार कायम
महिलांचा सवाल — न्याय मिळणार की जीव जाणार?
गडचिरोली, २७ फेब्रुवारी — चामोर्शी येथे कथित आर्थिक फसवणुकीविरोधात उपोषणाला बसलेल्या अन्यायग्रस्त महिलांची प्रकृती खालावल्याने आंदोलनाला गंभीर वळण लागले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील चार महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
आंदोलनकर्त्यांनी भाजपचे पदाधिकारी असल्याचा आरोप असलेल्या आशिष पिपरे व नगरसेविका सोनाली पिपरे यांच्यावर गरीब शेतकरी व शेतमजुरांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणांची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी करत महिला २३ फेब्रुवारीपासून उपोषणावर आहेत.
महिलांचे म्हणणे आहे की, अनेक निवेदने, पत्रकार परिषद व तक्रारी करूनही शासन-प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. नागपूर येथील जनता दरबारातही निवेदन देण्यात आले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही न्याय मागण्यात आला होता, मात्र अद्याप निर्णय न झाल्याने आंदोलन तीव्र झाले आहे.
आंदोलनकर्त्यांच्या आरोपानुसार ट्रॅक्टर खरेदी-विक्री, अगरबत्ती प्रकल्प तसेच जमीन व्यवहाराशी संबंधित प्रकरणांमध्ये फसवणूक झाली असून गरीब शेतकऱ्यांकडून कोऱ्या चेकवर स्वाक्षऱ्या घेऊन लाखो रुपयांची लूट करण्यात आली. काही तक्रारी नोंदवूनही चौकशी न झाल्याचा आरोप आहे.
दरम्यान, आशिष पिपरे यांनी सर्व आरोप फेटाळत आपण निर्दोष असल्याचे सांगितले असून उलट या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. राजकीय षडयंत्रातून आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
उपोषणकर्त्यांनी इशारा दिला आहे की, तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. महिलांची प्रकृती बिघडत असल्याने प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.









