Home Breaking News धाडसी युवकामुळे बसमधील प्रवाशांचे वाचले जीव  पराग काळस्पेच्या प्रसंगावधानामुळे पेटत्या ट्रॅव्हल्स...

धाडसी युवकामुळे बसमधील प्रवाशांचे वाचले जीव  पराग काळस्पेच्या प्रसंगावधानामुळे पेटत्या ट्रॅव्हल्स बसमधून प्रवाशांची सुटका

116

धाडसी युवकामुळे बसमधील प्रवाशांचे वाचले जीव

पराग काळस्पेच्या प्रसंगावधानामुळे पेटत्या ट्रॅव्हल्स बसमधून प्रवाशांची सुटका

पराशिवनी : पुणे ते नागपूर या मार्गावर धावणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या वेळी प्रसंगावधान राखत एका धाडसी युवकाने दाखवलेल्या धैर्यामुळे बसमधील अनेक प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून नागपूरकडे येणारी संजय ट्रॅव्हल्सची बस शुक्रवारी रात्री पराशिवनीजवळील रोंजणगाव परिसरात पोहोचली असताना अचानक बसमधून धूर निघू लागला. काही क्षणातच बसला भीषण आग लागली. बसमध्ये सुमारे २५ ते ३० प्रवासी प्रवास करत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

यावेळी पराशिवनी तालुक्यातील वडेश्वर येथील युवक पराग आनंददास काळस्पे (वय २५) यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबविण्यास चालकाला सांगितले. त्यानंतर त्यांनी बसचा आपत्कालीन दरवाजा उघडून प्रवाशांना बाहेर पडण्यास मदत केली. त्यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले.

दरम्यान, बसच्या दरवाजाजवळ एक गर्भवती महिला आणि एक वृद्ध व्यक्ती अडकले असल्याचे पराग यांच्या लक्षात आले. धुराने भरलेल्या बसमध्ये जीवाची पर्वा न करता ते पुन्हा आत गेले आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर आणले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे मोठी जीवितहानी टळली.

या भीषण आगीत प्रवाशांचे सामान, शैक्षणिक कागदपत्रे, कपडे व इतर साहित्य जळून खाक झाले. अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी पराग काळस्पे यांच्या धाडसामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

 

Don`t copy text!