गडचिरोलीत 11 वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण; 68 लाखांचे बक्षीस जाहीर असलेले सदस्य शरण
पोलीस व CRPF च्या संयुक्त कारवाईला यश; 2025 पासून आतापर्यंत 123 माओवाद्यांनी टाकली शस्त्रे
गडचिरोली (प्रतिनिधी) :
गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून आज (दि. 19 मार्च 2026) 11 वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस व सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांमध्ये डिव्हीसीएम, एरिया कमिटी सचिव, पीपीसीएम, कमांडर, एसीएम अशा उच्च पदावरील सदस्यांचा समावेश असून त्यांच्या शिरावर शासनाने एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
गेल्या काही वर्षांत पोलीस व सीआरपीएफच्या संयुक्त प्रयत्नांमुळे माओवाद चळवळीला मोठा फटका बसला आहे. कधीकाळी 10 उपविभागांत सक्रिय असलेली ही चळवळ आता केवळ भामरागड उपविभागातील सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिली आहे.
शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणामुळे अनेक माओवादी मुख्य प्रवाहात येत असून सन 2005 पासून आतापर्यंत तब्बल 794 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तर सन 2025 पासून आजपर्यंत 123 माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत.
विशेष म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये वरिष्ठ माओवादी नेते मल्लोजुला वेनुगोपाल राव उर्फ भूपती यांच्या आत्मसमर्पणानंतर माओवाद चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर देशभरातही मोठ्या प्रमाणावर माओवादी सदस्यांनी शरणागती पत्करली आहे.
आत्मसमर्पित माओवाद्यांना शासनाकडून पुनर्वसनासाठी आर्थिक मदत देण्यात येणार असून त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील यांनी उर्वरित माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाला पोलीस व सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





