पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुनगंटीवार व पुगलिया यांच्या हस्ते शिलापूजन; २५ महिन्यांत सदनिका पूर्ण करण्याचा विश्वास
वार्ताहर :
पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेचा पायाभरणी समारंभ भारतीय नववर्ष गुढीपाडवा (चैत्र प्रतिपदा) या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार तसेच चंद्रपूरचे माजी खासदार ज्येष्ठ नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते शिलापूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना नरेशबाबू पुगलिया यांनी संस्थेच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष आकार घेण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागल्याचे नमूद करत, आता सदनिकांचे बांधकाम वेगाने पूर्ण करून पुढील २५ महिन्यांत लाभार्थी पत्रकारांना घरे देण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनीही या प्रकल्पासाठी आवश्यक ते सहकार्य दिल्याचे सांगत, भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडत, जागा उपलब्ध करून देण्यासाठी नरेशबाबू पुगलिया आणि विविध प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेल्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला.
यावेळी वास्तुशिल्पज्ञ गौतम भगत यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संजय तायडे यांनी मनोगत व्यक्त करत सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुरलीमनोहर व्यास यांनी संस्थेच्या १९८३ पासूनच्या कार्याचा संक्षिप्त आढावा सादर करत कार्यक्रमाचे संचालन केले, तर कोषाध्यक्ष मजहर अली यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन सचिव बबनराव बांगडे, अरुण सहाय, सुनिल तिवारी, रवि नागपुरे आणि पंकज मोहरीर यांनी केले. सनातन परंपरेनुसार विधिपूर्वक पूजन मुरलीमनोहर व्यास व सौ. नीलम व्यास यांनी केले, तर पं. पवन व्यास यांनी शास्त्रोक्त विधी पार पाडले.
या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीधरराव बल्कि, नगरसेवक रवि लोणकर, तसेच शहरातील अनेक मान्यवर नागरिकांची उपस्थिती होती.






