*हवं तर आरसी व सातबारा घ्या; पण इंधन द्या*
*काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी*
गडचिरोली: येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरवात होणार आहे. रब्बी हंगामातील पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू झाला असल्याने खरीपासाठी शेतीचा पोत तयार करण्याच्या कामाला शेतकरी लागले आहे. यासोबतच घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचीही वाहतूक ग्रामीण भागातील शेतकरी ट्रॅक्टरच्या माध्यमातून करीत आहेत. मात्र, त्यांना पेट्रोलपंपावर बॅरेलमधून इंधनच दिला जात नसल्याची ओरड आहे. हवं तर त्यांच्याकडून ट्रॅक्टरचा आरसी बूक घ्या, घरकुलाचे कार्यारंभ आदेश मागवा अथवा सातबारा घ्या, पण त्यांना इंधन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात असलेल्या पेट्रोल पंपावर इंधनाची कृत्रीम टंचाई निर्माण झाली आहे. ऐरवी शेतकऱ्यांना बॅरेलमध्ये इंधन दिले जात होते. मात्र, विद्यमान परिस्थितीत त्यांना वाहन घेऊन येण्याचा सल्ला दिला जात आहे. तीन- चार हजार रुपयाचे इंधन खरेदी करण्यासाठी ३० ते ४० किमी अंतरावरून ट्रॅक्टर घेऊन येणे परवडण्या सारखे नाही. ३० ते ४० किमीचा प्रवास करण्यासाठी ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणावर इंधन लागते. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना इंधन मिळत नसल्यामुळे वाहन उभे करून ठेवावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने ट्रॅक्टरधारकांकडून अपेक्षित असलेल्या कागदपत्रांची मागणी करावी, पण त्यांना इंधन बॅरेलमधून उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेक परिसरात पेट्रोल पंप नाही. शहरात सध्या स्थिती अनेक पेट्रोलपंपावर इंधन नसल्याच्या पाट्या लावल्या जात आहेत. अशा परिस्थित ३० ते ४० किमीचा प्रवास करून येणाऱ्या नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ही स्थिती असतानाच ट्रॅक्टरला लागणाऱ्या इंधनासाठी थेट ३० ते ४० किमीचा प्रवास करून वाहन घेऊन येणे कसे शक्य आहे? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सामान्य शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पेट्रोलपंप धारकांना निर्देशीत करून ट्रॅक्टरसाठी बॅरेलमधून इंधन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.





