ठाणेदार व तहसीलदार यांच्या उपस्थितीत केंद्रावरील खरेदी केलेल्या धानाची उचल करा :- आमदार डॉक्टर देवरावजी होळी

271

आदिवासी विकास महामंडळाचा,जिल्हा मार्केटींग फेडरेशनचा, कृषी उत्पन्न बाजार समितीचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघडकीस येणार

केवळ कागदोपत्री सातबारा ऑनलाइन करून खरेदी न केलेल्या धानाची सत्यता बाहेर येणार

जिल्हा पुरवठा अधिकारी, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक , जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक- सभापती यांच्या संगनमताने शासनाची लूट सुरू असल्याचा आरोप

दिनांक 18 मे 2021 गडचिरोली

आदिवासी विकास महामंडळ व गडचिरोली जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने धान खरेदी प्रक्रियेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असून प्रत्यक्ष धान्य खरेदी न करता केवळ कागदोपत्री सातबारा ऑनलाईन नोंदणी करून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे.त्यामुळे या धानाची उचल (D O ) करताना त्या क्षेत्रातील ठाणेदार व तहसीलदार यांच्या उपस्थितीत धानाची उचल करावी अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, आदिवासी विकास मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने धान खरेदी करताना प्रत्यक्ष धानाची खरेदी न करता केवळ सातबारा ऑनलाइन करून धान खरेदी केल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धानाची विक्री केली अशा शेतकऱ्यांकडून सातबारा जमा करण्यात आले परंतु ऑनलाइन करण्यात आले नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे धानाचे पैसे व बोनस सुद्धा मिळाले नाही शेतकरी वारंवार याबाबत आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटींग फेडरेशन कडे विचारणा करीत आहेत मात्र मागील अनेक दिवसांपासून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ न देता नियोजित व्यापाऱ्यांना व स्वतःचा लाभ यातून मिळविला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची अतिशय गंभीरतेने चौकशी करण्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच गोडाऊन मधील धान्याची उचल सध्यास्थितीत न करता खरेदी केंद्रावर उघड्यावर असणाऱ्या धानाची उचल करावी. व धानाची उचल करतांना त्या क्षेत्रातील पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांच्या उपस्थितीत धानाची उचल करावी. जेणेकरून प्रत्यक्ष धानाची खरेदी न करता केवळ ऑनलाइन नोंदणी करून खरेदी केलेल्या धानाची व प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाची सत्यता बाहेर येईल.

या प्रक्रियेत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या नावावर शासनाची कोट्यावधी रुपयांची लूट करण्यात येत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक , जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक- सभापती यांच्या संगनमताने शासनाची लूट सुरू असल्याचा आरोप आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केला असून या सर्वांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी शासनाला केली आहे