धानोरा तालुक्यात रब्बी धान खरेदी केंद्र सुरू करा वामनराव सावसागडे यांची आदिवासी विकास महामंडळाकडे मागणी

146

धानोरा :- जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून रब्बी हंगामात धानाची लागवड केली जात आहे. यामुळे दरवर्षीच उन्हाळी हंगामात घेतलेल्या धानाची विक्री करण्यासाठी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत असते. मात्र, शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे योग्य नियोजन केले जात नाही. याचा फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसते. शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे याकरिता काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे यांनी पुढाकार घेऊन आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक कोटलावार यांची भेट घेऊन चर्चा केली. तालुक्यातील रांगी परिसरात त्वरित शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
धानोरा तालुक्यातील रांगी परिसरात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात धानाची लागवड केली. मात्र, शासकीय हमीभाव दराने धानाची खरेदी करणारे हमीभाव केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कवडीमोल भावाने धानाची विक्री करावी लागत आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभाव दरानुसार शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. सध्या खुल्या बाजारात १२०० ते १३०० रुपये प्रति क्विंटल दर दिला जात आहे. अशी बिकट परिस्थिती असताना सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून खरेदी केंद्र सुरू केले जात नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ही समस्या लक्षात घेऊन किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे यांनी रांगी येथील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील रिकाम्या जागेवर (खोल्यांमध्ये) धान खरेदी केंद्र सुरू करावे, रांगी येथील शासकीय आश्रमशाळा कोरोनामुळे बंद आहे. तिथे धान खरेदी केंद्र सुरू केल्यास धानाची नासाडी होणार नाही. सोबतच शासनाला धान उघड्यावर खरेदी केल्यामुळे बसणारा आर्थिक फटकाही बसणार नाही. असा सल्लाही त्यांनी दिला. आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक यांनी सर्व समस्या समजून घेऊन धान खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता त्वरित प्रशासकीय कारवाई सुरू केली. यामुळे लवकरच रांगी परिसरात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होणार असल्याचा विश्वास महामंडळाचे व्यवस्थापक कोटलावार यांनी सावसागडे यांना दिला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतिश विधाते, काँग्रेसचे रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष काशिनाथ भडके आदी उपस्थित होते.