जीवीत हानी टळली,नगर प्रशासनाचा मनमानी व भोंगळ कारभार चव्हाट्यावर
देसाईगंज-ता.प्र.:-
आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील प्रगत नगर पालिका म्हणून नावलौकिक असलेल्या देसाईगंज नगर परिषद अंतग॔त येत असलेल्या मटन मार्केटचे टिनशेड बुडापासुनच उखडून कोसळल्याने एकुणच नगर प्रशासनाचे मनमानी व भोंगळ कारभार पुरते चव्हाट्यावर आले असुन नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात जीवीत हानी टळली असली तरी यामुळे नगर प्रशासनाच्या उदासिन धोरणाबाबत माञ नागरिकांतुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
“देसाईगंज मटन मार्केट मधिल शेड झाले जिर्ण” या मथळ्याखाली दैनिक लोकमत दि.२५ ऑक्टोबर 2020 रोजी वृत्त प्रकाशित करून येथील समस्या अवगत करुन देण्यासोबतच जीर्ण लोखंडी टीनशेडमुळे अनुचित घटना घडल्यास जीवीत हानी होण्याची शक्यता वर्तवली होती.माञ या गंभीर बाबीची दखलच घेण्यात आली नसल्याने अखेर ७ जुलैच्या सायंकाळ पासुन सुरु असलेल्या पावसामुळे गंजलेले व जिर्ण झालेले लोखंडी खांब उखडून पडले असुन यामुळे मटन विक्रेत्यांना जीव मुठीत घेऊन पळावे लागल्याने एकुणच हातावर आणुन पानावर खाणा-या मटन विक्रेत्यांचा व्यवसाय माञ पुरता अडचणीत आला आहे.
विशेष बाब अशी की २५ वर्षापुर्वी बनविण्यात आलेले व लोखंडी खांबाच्या भरोशावर उभे असलेल्या टिनशेडाचा उखडलेला एकुणच भाग पाहु जाता सदरचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे व चालचलावु करण्यात आल्यानेच सदर खांब बुडापासुन उखडले असुन मागील अनेक वर्षांपासून सदरचे गंजलेले खांब उखडून कधिही पडण्याच्या स्थितीत असताना एकदाही डागडूजी करण्यात आली नाही याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान मटन मार्केट मधिल टिन शेड उखडून पडण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता याबाबत युवक काॅग्रेसचे शहर अध्यक्ष पिंकु बावणे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करुन सदर गंजलेल्या लोखंडी टीनशेडमुळे जीवीत हानी व वित्त हानी होण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेता तत्काळ डागडूजी करण्याची मागणी केली होती.माञ त्यांच्याही मागणीला केराची टोपली दाखविण्यात आल्याने अखेर लोखंडी टीनशेड खांबासह उखडून पडले असता जीवित हानी टळली असली तरी ऐन पावसाळ्यात सदर घटनेमुळे मटन मार्केट मधिल मटन विक्रेत्यांचा व्यवसाय प्रभावित झाला असल्याने रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तथापि अनेक अडचणी निर्माण झाल्या असुन यास सर्वस्वी नगर प्रशासनाचा मनमानी व भोंगळ कारभारच जबाबदार असुन कर्तव्यात हयगय केल्याप्रकरणी जबाबदार धरून वरिष्ठांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन संबंधित अधिका-यावर उचित कारवाई करण्याची मागणी मटन विक्रेत्यांनी केली आहे. याबाबत नगर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे शहरवाशियांचे लक्ष लागुन आहे.