ताटीगुडम येथे महिला बचत गटांना कापणी यंत्राचे वाटप

125

माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते

आधुनिक पद्धतीने शेती करून विकास करण्याचे केले आवाहन

अहेरी:- तालुक्यातील कमलापूर लगतच्या ताटीगुडम येथे गुरुवार 8 जुलै रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते अनुसूचित जमातीतील (एसटी) शेतकरी महिला बचत गटांना कापणी यंत्राचे (रिपर)वाटप करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने जय पेरसापेन शेतकरी महिला बचत गट ताटीगुडमचे अध्यक्षा वंदना कोडापे, लक्ष्मण येरावार, सुरेंद्र अलोने, क्षेत्र तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल दहागावकर, लिकेश्वर मारगीया आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित ताटीगुडम येथे जय पेरसापेन स्वयंसहाय्यता महिला शेतकरी बचत गट ताटीगुडम, कालीकणकाली महिला शेतकरी बचत गट आसा, पूजा महिला बचत गट जिम्मेला, जागृती महिला बचत गट गुडीगुडम, भवानी महिला बचत गट इतलचेरू, लक्ष्मी बचत गट ताटीगुडम, पार्वती महिला बचत गट रेपनपल्ली आदी 22 अनुसूचित जमातीतील (एसटी) महिला शेतकरी बचत गटांना कापणी यंत्राचे वाटप भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी, शेती आता जुने व पारंपरिक पद्धतीने नव्हे तर नवं नवे तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतीने करणे काळाची गरज बनली असून शेतात महिला शेतकऱ्यांनी कमी वेळात व अल्पावधीत भरपूर पिके घेऊन आपले आर्थिक स्तर उंचवावे असे आवाहन केले.
प्रामुख्याने धान आणि सोबतच गंहू, हरभरा सारखे पिके कापण्यासाठी कापणी यंत्राचे (रिपर)उपयोग होणार असून याचा लाभ प्रत्येक शेतकरी महिला बचत गटांनी करून शेती सोबतच लघु व नाविन्यपूर्ण उद्योग करून आर्थिक उन्नती साधावे असे मोलाचे सल्ला सुद्धा यावेळी भाग्यश्रीताई आत्राम यांनी दिले.
यावेळी मीरा मडावी, रेखा दुर्गे, शारदा आत्राम, सुनीता कुळमेथे, विनोदा आलम आदी शेतकरी महिला बचत गटाचे पदाधिकारी व सदस्या उपस्थित होते.