आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टिवार
यवतमाळ दि. 9 ऑगस्ट : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने समर्पित भावनेने काम करून महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशा शब्दात आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी यवतमाळ शासकीय महाविद्यालयाचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप दिली.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन कोविड उपाय योजनेचा आढावा घेतला. यावेळी आमदार वजाहत मिर्झा, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे, कोरोना समन्वयक तथा शल्यचिकित्सा विभागचे प्रमुख डॉ. सुरेंद्र जतकर, अधिक्षक डॉ. सरेंद्र भुयार प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी हॉस्पिटलमध्ये पुरेसे व्हेंटिलेटर आहे का?, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत आहे का?, ऑक्सीजन बेड किती आहेत ? तसेच मनुष्यबळ उपलब्धता ? याबाबत प्रश्न विचारून अडचणी जाणून घेतल्या. वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजन बॉटलिंग प्लांट लावण्यात यावा असे त्यांनी सुचविले, तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्याला लाटेत मागील सर्वाधिक बाधीत रुग्णांच्या दीडपड रुग्णसंख्या गृहीत धरून त्यातील सुमारे 15 ते 16 टक्के रुग्णांना व्हेटींलेटर, आयसीयु व ऑक्सीजन बेडची गरज पडेल यादृष्टीने उपाययोजना व पुर्वतयारी करून ठेवावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविडच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तीसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयात एकूण 787 बेडची व्यवस्था करण्यात आली असून त्यातील 700 बेडला ऑक्सीजन पुरवठा आहे. तसेच लहान बालके व नवजात बालकांसाठी 60 ऑक्सीजन बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयात 20 मेट्रिक टन क्षमतेचा लिक्वीड ऑक्सीजन टँक कार्यान्वित करण्यात आला असून दुसऱ्या टँकचे काम देखील लवकरच पुर्ण करण्यात येत आहे तसेच 4.3 मेट्रिक टन क्षमतेचे दोन पी.एस.ए. प्लँट व 736 जम्बो सिलेंडरच्या माध्यमातून 51.4 मेट्रीक टन ऑक्सीजन साठा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येत असल्याची माहिती डॉ. कांबळे यांनी सादर केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, माजी आमदार विजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते.
0000