● जिल्ह्याच्या शिरापेचात मानाचा तुरा
●राज्यातील केवळ दोन शिक्षकाचा समावेश
सिरोंचा (वा.)
केंद्र शासनाद्वारे दिल्या जाणा-या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अशा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यात राज्यातील केवळ दोन शिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये राज्याचा शेवटचा टोक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा सिरोंचातील आसरअल्ली जि. प. उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासीबहूल भागातील शिक्षकाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाल्याने जिल्ह्याच्या शिरापेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे.
समाजाची निस्वार्थ भावाने तसेच निष्ठेने सेवा करणा-या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान व्हावा या उद्देशाने केंद्र शासनाद्वारे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. नुकताच केंद्र शासनाने 2021 साठीच्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची घोषणा केली. यात देशभरातील 44 शिक्षकांना सदर पुरस्कार घोषित करण्यात आला असून यात महाराष्ट्र राज्यातील दोन शिक्षकांचा समावेश आहे. उस्मानाबाद येथील उमेश खोसे यांचेह गडचिरोली जिल्ह्यातील आसरअल्ली जिप शाळेचे आदर्शवत शिक्षक खुर्शिद शेख यांना शिक्षक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. खुर्शिद शेख यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागात आनंदाचे वातावरण असून विशेष म्हणजे अतिदुर्गम भागात विद्यार्जनाचे मोठे आवाहन असतांना शेख यांनी केलेल्या कृतत्वनिष्ठेमुळे त्यांचे सर्वच स्तरावरुन अभिनंदन केल्या जात आहे.