गडचिरोली, (जिमाका) दि.08 : विशेष कोविड लसीकरण मोहिमेत राज्यामध्ये लसीकरणाला गती देण्याकरीता “मिशन कवच कुंडल मोहिम” दिनांक 8 ऑक्टोंबर 2021 ते 14 ऑक्टोंबर 2021 या दरम्यान प्रभाविपणे राबविण्याकरीता गडचिरोली तालुका टास्क फोर्स ची सभा संपन्न झाली. तहसिलदार महेंद्र गणविर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभ घेण्यात आली. सभेला मुकेश माहोर संवर्ग विकास अधिकारी गडचिरोली, डॉ.सुनिल मडावी, सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी व तालुक्यातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यासभेमध्ये गाव निहाय कुटूंबाचे सर्वेक्षण करून कोविड प्रतिबंधात्मक लसीची पहिली व दुसरी मात्रा करीता पात्र असलेल्या लाभार्थ्यांना गाव पातळीवर लसीकरण सत्र आयोजित करुन सर्व लाभार्थीचे 100 टक्के लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित ग्राम स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्ती, शिक्षकांनी सर्वेक्षण करण्याच्या सुचना देण्यात आल्या. लसीकरण केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या आशांनी लाभार्थीसाठी मोबीलायझर म्हणुन काम करावे, व ज्यादिवशी लसीकरण नसेल त्यादिवशी सर्वेक्षणाच्या कामात मदत करावी अशा सुचना देण्यात आल्या. याप्रमाणे लसीकरणाकरीता पात्र असलेल्या लाभार्थ्यांना लसीकरण करण्याकरीता गाव निहाय लसीकरण सत्राचे आयोजन आरोग्य विभाग गडचिरोली यांनी करण्याचे निर्देश सभेमध्ये देण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व दुकानदार, व्यवसायीक, फळविक्रेते यांनी या मोहिमेदरम्यान नजिकच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घेणे गरजेचे असल्याचे निर्देश सभेमध्ये देण्यात आले. तसेच ज्या पालकांची मुले अंगणवाडी व शाळेत जात आहेत त्यांनी प्राध्यान्यांनी लस घेणे अनिवार्य आहे, असे निर्देश सभेमध्ये देण्यात आले.
संपुर्ण नागरीकांच्या लसीकरणामुळे महत्त्वाचे तीन फायदे
कोविड आजाराची प्रसाराची साखळी तोडण्यास मदत होते. कोविड लसीकरणामुळे 97 ते 98 टक्के मृत्युचे प्रमाण कमी होते. कोविड लसीकरणामुळे आजाराची गंभीरता टाळण्यास मदत होते, व रुग्णालयात भरतीची आवश्यकता टाळता येते.
शहरी भागातील वार्डनिहाय लसीकरण सत्राचे आयोजन केले आहे. तरी सर्व नागरीकांनी लस
घेतली नसल्यास या मोहिमेत सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभाग गडचिरोली यांनी केले आहे.
*****