आदिवासी युवा एकता परिषद गडचिरोली चे वतीने लांझेडा येथे महिला हिंसाचार जनजागृती कार्यक्रम संपन्न दिनांक 1 डिसेंबर रोजी एड्स दिनानिमित्त सायंकाळी 5 : 00 वाजता लांजेडा येथे आदिवासी एकता युवा परिषद गडचिरोली च्या वतीने महिला हिंसाचार विरोधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्रीमती सौ पुष्पाताई ब्राम्हणवाडे सामाजिक कार्यकर्ता, मार्गदर्शक म्हणून अॅड. निलिमा जुमनाके, श्रीमती कुसुमताई अलाम,निताताई वडेट्टीवार, प्रा अरुण भोसले उपस्थित होते. अॅड निलीमा यांनी महिलांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या हिंसेबाबतची कल्पना देऊन त्यांचा प्रतिकार करण्यासाठी महिलांनी कोणत्या प्रकारची दक्षता घेतली पाहिजे यावर विस्तृत माहिती दिली. अरुण भोसले यांनी महिलांवरील अत्याचाराचे काही दाखले देऊन महिलांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. सौ पुष्पाताई ब्राम्हणवाडे यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, आता महिलांनी पुरुषमंडळी कडून होणारे अनन्वित अत्याचार सहन करायचे नाहीत. कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी केवळ महिला वर्गांनी घ्यायची आणि पुरुषांनी घरातील महिलांना गुलामासारखे वागवायचे हे आता कुठेतरी संपायला हवे. जोपर्यंत महिलांचे सक्षमीकरण होणार नाहीत तोपर्यंत महिला वरील अन्याय अत्याचार थांबणार नाहीत. महिलांना कायद्याची जाणीव असणे आवश्यक आहे. यासाठी अॅड. निलिमा सारख्या भगिनींची समाजाला गरज आहे असे मत प्रतिपादन केले. सौ मानकाबाई मेश्राम, श्रीमती शशीबाई मडावी, यांनी महिलांवर होणाऱ्या व्यथा मांडल्या. प्रास्ताविक कुसूमताई अलाम तर संचलन महा अंनिस चे सदस्य श्री विलास निंबोरकर व आभार मा गोविंदराव ब्राम्हणवाडे अंनिस कोषाध्यक्ष, यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मा तुलाराम नैताम, सौ अल्का नैताम, इंदिराबाई नैताम यांनी अथक परिश्रम घेतले. मानकाबाई सुधाकर मेश्राम, पारबताबाई दशरथजी गेडाम, सुषमा गणेश मडावी,शकुंतला सोमनकार, मंगला नैताम, शेवंता बाई टिंगुसले, अल्का नैताम, इंदिरा नैताम, कासुबाई नैताम,वंदना नैताम, लिलाबाई नैताम, मडावी ताई, नैतामताई व दारुबंदी च्या इतर महिला सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होत्या.यावेळी महिला हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यात आली. महिलांच्या विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली.