लसीकरणासाठी पुढे येण्याचेही केले आवाहन
संसर्गाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी झाली आता नागरिकांची वेळ
गडचिरोली, दि.02, जिमाका :- कोरोनाच्या ओमीक्रॉन या विषाणूच्या धर्तीवर शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून यापुर्वी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना रद्द करून नव्याने सुधारीत उपाययोजना नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या कोरोनाच्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरून व संपुर्ण लसीकरण करून सहकार्य करावे असे आवाहन गडचिरोली जिल्हयाचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना शारिरीक अंतर राखले पाहिजे तसेच गर्दी केली नाही पाहिजे असे त्यांनी माध्यमांमार्फत नागरिकांना आवाहन केले. गडचिरोली जिल्हयात 76 टक्के नागरिकांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच दुसरा डोस 38 टक्के लोकांनी घेतला आहे. यामध्ये दक्षिणेकडील सिरोंचा, अहेरी, भामरागड व एटापल्ली येथील लसीकरण मोठ्या प्रमाणात बाकी आहे. त्या ठिकाणांसह जिल्ह्यात आरोग्य विभाग गावोगावी जावून लसीकरणाची व्यवस्था करीत आहे. परंतू आता त्या ठिकाणी नागरिकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून पुढे येणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शीवाद उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हयात संसर्ग झालेल्यांसाठी आवश्यक बेड, ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटीलेटर तसेच आवश्यक मनुष्यबळ यांची व्यवस्था आहे. परंतू संसर्ग होवूच नये म्हणून लोकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विषाणू कोणताही असला तरी त्याला रोखण्यासाठी आपल्याकडे सर्वांत सोपा मार्ग हा मास्क वापरणे, शारिरीक अंतर राखणे व लसीकरण करणे हा त्रिसुत्री पर्याय आहे.
व्यापारी, दुकानदार यांचीही जबाबदारी मोठी – सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणारी ठिकाणे यात दुकाने, सार्वजनिक वाहतूक, विविध सेवा देणाऱ्या आस्थापना यांच्या मालकांनी आता ग्राहकांना लसीकरणाबाबत व मास्क बाबत विचारणा करणे आवश्यक आहे. संबंधित आस्थापनांच्या मालकांनी ग्राहकांना बंधने घालून दिल्यास निश्चितच लसीकरण होण्यास, मास्कचा वापर वाढण्यास मदत होईल. कारण संसर्गाचा धोका सर्वांनाच आहे.
जिल्हयात 100 टक्के लसीकरण आवश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आर्शीवाद
गडचिरोली जिल्हयातील काही तालुके अतिशय चांगली लसीकरण मोहिम राबवित आहेत. यात कुरखेडा, वडसा, चामोर्शी तसेच गडचिरोली यांचा समावेश आहे. त्यांनी आता 100 टक्के लसीकरण पुर्ण करावे. तसेच उर्वरीत तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या मेहनतीला सहकार्य करून लसीकरण करून घेण्यावर भर द्यावा असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शीवाद यांनी सांगितले. जिल्हयात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी, त्यामूळे होणारे नुकसान टाळण्यासाठी 100 टक्के लसीकरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गावागावात लसीकरण कॅम्प घेण्यात येत आहेत. परंतू आता संसर्ग कमी असल्यामुळे नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले की काय अशीच स्थिती आहे. तसे न करता कोरोनाचा विषाणू नवनवीन प्रकारात समोर येत आहे यासाठी लसीकरण आवश्यकच आहे. लसीकरण करून आपल्यासह आपल्या कुटुंबाला सुरक्षित करण्याची ही वेळ असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.