गडचिरोली, (जिमाका) दि.15 :- मतदार यादी येत्या 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम स्वरुपात प्रसिध्द करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून आलेल्या असल्यामुळे त्यामधील प्रलंबीत दावे व हरकती तातडीने निकाली काढाव्यात अशा सुचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी दिल्या. त्या गडचिरोली येथे छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत आढावा घेण्यासाठी आल्या होत्या. सद्यास्थितीत जिल्हयात विधानसभा मतदार संघातून 935 मतदान केंद्र आहेत. यात एकूण मतदार 790502 असून पुरुष 400113, महिला 390386 तर तृतीयपंथी 3 आहेत. 1 नोव्हेंबर पासून नव्याने मतदार नोंदणीसाठी, यादीतून नाव वगळण्यासाठी व नाव इतरत्र स्थलांतरीत करण्यासाठी 22118 अर्ज दाखल झाले आहेत. 8949 अर्ज स्विकारले त्यातील 131 नाकारले आहेत. 13038 अर्ज प्रलंबित आहेत. 20 डिसेंबर पर्यंत सदर प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे उद्दीष्ट आहे. मतदार यादी शंभर टक्के योग्य होण्यासाठी सर्व दावे व हरकती वेळेत सोडवून मतदारांना त्याची माहिती मिळणे आवश्यक आहे. मतदार यादी मध्ये 80 वयापेक्षा जास्त असलेल्या तसेच 100 वय वर्षे पूर्ण झालेल्यांची खात्री प्रत्यक्ष गावात जावून होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यात 80-89 वयाचे 15844 मतदार, 90-99 वयाचे 3005 तर 100 पेक्षा जास्त वय असलेले 273 मतदार आहेत.
स्वीप कार्यक्रमाची गती वाढवा– मतदार जनजागृती करीता राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांची गती वाढविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे – वर्मा यांनी बैढकीत दिल्या. नवमतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र दुरुस्ती प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व अशा बाबी राबविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात यावेत. तसेच दुर्गम भागातही स्थानिक प्रशासनाला स्वीप बाबत कार्यक्रम घेण्याचे निर्देश द्यावेत असे त्या यावेळी म्हणाल्या.
जिल्हा नियोजन मधील निधी खर्चाबाबत आयुक्तांनी घेतला आढावा – विभागीय आयुक्त नागपूर प्राजक्ता लवांगरे यांनी गडचिरोली जिल्हा नियोजन मधील विविध योजनांचा सद्यास्थितीचा आढावा घेतला. यावेळी मार्च अखेर वितरीत निधी वेळेत खर्च करण्याचे त्यांनी अंमलबजावणी यंत्रणेला निर्देश दिले. विभागनिहाय आढावा घेवून त्यांनी तातडीने आरोग्य विभाग, कृषी विभाग तसेच शिक्षण विभागातील प्रस्तावित कामे पुर्ण करावे अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. या आढावा बैढकीत जिल्हाधिकारी संजय मिणा, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अति.पोलीस अधिक्षक समीर शेख, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.