लसीकरणाच्या गतीसह आरटीपीसीआर तपासण्या वाढवा- विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे यांचे निर्देश

41

गडचिरोली, (जिमाका) दि.15 :- विभागीय आयुक्त नागपूर प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी कोविड बाबत आढावा घेताना जिल्हयात लसीकरण वाढविण्या बरोबरच आरटीपीसीआर कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडबाबत येणाऱ्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, गडचिरोली जिल्हयात इतर जिल्हयांच्या तुलनेत उशिरा कोविड संक्रमण वाढत आहे. त्यामुळे लोक संसर्गाबाबत अनभिज्ञ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता लसीचा पहिला डोस उर्वरीत नागरिकांना देण्याबरोबर पात्र लोकांना दुसरा डोसही द्यावा. तसेच कोरोनाची चाचणी करतांना आरटीपीसीआर ची टक्केवारी वाढवावी. त्यामुळे संसर्ग झालेल्यांची खात्री योग्यप्रकारे होईल व त्यांच्या संपर्कातील इतरांचाही शोध नेमक्या स्वरुपात घेता येईल. या बैठकीला जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संजय जठार व इतर आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

लसीकरण्याबाबत दुर्गम भागातील गैरसमज दूर करा – गडचिरोलीतील एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्या ठिकाणी पहिला डोस घेतलेली संख्या इतर तालुक्यांच्या तुलेनत फारच कमी आहे. त्यामुळे अशा ठिकाणी वेगळया प्रकारच्या मोहिमा राबवून त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून जनजागृती करावी अशा सूचना प्राजक्ता लवांगरे यांनी बैठकीत दिल्या. यासाठी गावस्तरावरील आशा, अंगणवाडी ताई, शिक्षक, तलाठी तसेच ग्रामसेवकाची मदत घेणेत येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी यावेळी पुढिल आठवडयापासून 300 चमुंची विशेष लसीकरणाची मोहिम सुरु करणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच आता घरोघरी लसीकरण करुन गडचिरोली जिल्हयात 100% उद्दीष्ट पुर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
त्याचबरोबर विभागीय आयुक्त यांनी व्हेंटीलेटर, ऑक्सिजन प्लान्ट, बेडस यांची उपलब्धता, सद्यास्थितीत सुरु असल्याची खात्री करण्यासह त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करण्याच्या सूचना केल्या. ऑक्सिजन प्लान्ट यापुढे अखंड सुरु राहण्यासाठी मनुष्यबळ निर्मितीबरोबर कौशल्य मनुष्यबळ असलेल्यांची निर्मिती करावी याकरीता जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण मधून तरुणांची निवड करता येईल यासाठी नियोजन करावे अशा सूचनाही दिल्या.