माध्यमांची एकाधिकारशाही लोकशाहीसाठी घातक :एस.एम.देशमुख

42

माध्यमांची एकाधिकारशाही लोकशाहीसाठी घातक :एस.एम.देशमुख

शेगाव : देशातील ९० टक्के मिडिया २५ भांडवलदारांच्या हाती एकवटला असून तो सत्तेची तळी उचलून धरताना दिसतो आहे ही स्थिती आणि एकूणच माध्यमांची एकाधिकारशाही लोकशाहीसाठी मारक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्यक्त केले..
मराठी पत्रकार परिषद सलग्न बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाचा जिल्हास्तरीय मेळावा आणि नवनिर्वाचित पदाधिकारयांचा सत्कार काल शेगाव येथे करण्यात आला.. त्यावेळी देशमुख बोलत होते..
एस.एम देशमुख म्हणाले, एकट्या रिलायन्सच्या ताब्यात ३६ चॅनल्स आहेत, अन्य २४ मोठ्या मिडिया हाऊसेसकडे देखील मोठ्या संख्येनं चॅनल्स, वर्तमानपत्रं एकवटलेली आहेत.. एनडीटीव्ही सारखे स्वतंत्र विचारांचे आणि तटस्थ बाण्याचे चॅनल देखील आता भाडवलदाराच्या ताब्यात गेले आहे…त्यामुळे आजच्या माध्यमात लोकभावनांचे प्रतिबिंब उमटत नाहीत अशा तक्रारी लोक करतात.. विशिष्ट राजकीय पक्षांची मुखपत्रं असल्यासारखी, आणि “हम करे सो कायदा बाण्यानं” ही माध्यमं वागत असल्याने राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा मुख्य मिडियात कुठेच दिसत नाही.. सोशल मिडिया नसता तर राहूल गांधी कुठे आहेत हे समजलेही नसते.. ही परिस्थिती धोकादायक आणि लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले..
एस.एम पुढे म्हणाले, डिजिटल मिडिया अधिक बलशाली होणे हा यावरचा उत्तम पर्याय असला तरी डिजिटल मिडियाला प्रिंट मिडिया सारखी आपली विश्वासार्हता सिध्द करावी लागेल.

नव्या व्यवस्थेत पत्रकार एकाकी पडला आहे.. भांडवलदारी मालक, शासन व्यवस्था अथवा पत्रकारांकडून हजार अपेक्षा व्यक्त करणारा समाजही आज पत्रकारांसोबत नाही.. अशा
स्थितीत पत्रकारांना संघटीत होण्याशिवाय पर्याय नाही.. पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली पत्रकारांनी एकत्र येत आपल्या हक्कासाठी आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले.. असे झाले नाही तर पत्रकारांना पुढील काळात आजच्यापेक्षा मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल.. हा धोका एस.एम देशमुख यांनी नजरेस आणून दिला..
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, उपाध्यक्ष शरद काटकर, राजेंद्र काळे, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे आदिंची भाषणं झाली.. रजपूत यांनी सूत्र संचालन केले.. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकारयांचा यावेळी एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक आणि शरद पाबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. कार्यक्रमास जिल्ह्यातील दिडशे पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते..