महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या लढ्याला यश
माननीय श्री संतोष द सुरावार सर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली यांच्या अथक प्रयत्नामुळे व खंबीर नेतृत्वामुळे सतत पाठपुरावा केल्यामुळे मला अखेर ४ वर्षानंतर न्याय मिळाला.
मी दिलीप यशवंत तायडे, सेवानिवृत्त शिक्षक स्व. वसंतराव नाईक प्राथमिक आश्रम शाळा रेखेेगाव /अनंतपुर,तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे सन १९९८ पासून या शाळेत कार्यरत होतो. सन १९९८ ते १५ एप्रिल २०१६ पर्यंत या १८ वर्षाच्या सेवेत मला माननीय संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापक यांचेकडून एकही नोटीस मिळालेली नव्हती. १६ मार्च २०१६ ला वेतनश्रेणीमधील फरकाची रक्कम मला मिळाली होती. ती संपूर्ण रक्कम संस्था प्रमुखांनी मला मागितली होती.ती रक्कम मी न दिल्यामुळे मला शाळेत येण्यास बंदी घातली होती. तसेच माझ्यावर खोटे आरोप केले.परंतु मी चुकीचे कोणतेही काम केले नसल्यामुळे मी सरळ शाळा न्यायाधीकरण(ट्रिब्युनल कोर्ट) चंद्रपूर येथे केस दाखल केली. चुकीच्या मार्गाने गेलो होतो. तब्बल ३० महिने माझा पगार बंद होता. त्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना भेटलो, आमदारांना भेटलो,खासदारांना भेटलो पण काहीही फायदा झाला नाही. त्या पडतीच्या काळात माझ्या पाठीमागे कोणीही खंबीरपणे उभे राहिले नाही.
अखेर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संतोष द.सुरावार सर यांची ५ फेब्रुवारी २०१८ ला त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.अचानकपणे देवदूताच्या रूपात माननीय सुरावार सरांची भेट झाली. शब्दशः त्यांचा मी ऋणी आहे. माझी संपूर्ण समस्या व केस काळजीपूर्वक त्यांनी समजून घेतली. लगेच माननीय सुरावार सरांनी माननीय सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांच्याकडे माझ्या केसचा सतत पाठपुरावा करत होते.अखेर आयुक्तांनी मुख्याध्यापक व संस्था अध्यक्षाविरुद्ध कार्यवाही सुरू केली.
माननीय सुरावार सरांनी माननीय गाणार सर यांच्यामार्फत प्रशासनाविरुद्ध पत्रव्यवहार सुरूच ठेवला. श्री गाणार सरांचाही मी आभारी आहे.
माननीय सुरावार सर यांनी माझी केस चंद्रपूरच्या न्यायालयातून परत घेण्यासाठी माननीय सुरावार सरांचे जिवलग मित्र एडवोकेट माननीय अभयभाऊ पाचपोर यांच्या मदतीने शाळा न्यायाधिकरण चंद्रपूर येथून दिनांक २७/७/२०१८ रोजी माझी केस काढून घेतली. माननीय अभयभाऊ पाचपोर यांचा मी शेवट पर्यंत ऋणी राहीन
अखेर श्री सुरावार सरांच्या प्रयत्नामुळे मला संस्था अध्यक्षांनी १७ ऑगस्ट २०१८ मध्ये शाळेवर रुजू करून घेतले. मी माझे अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे करत असताना पुन्हा ८ मे २०१९ मध्ये मी अतिरिक्त नसताना संस्था अध्यक्षांनी अतिरिक्त ठरवून गोंदिया जिल्हा मध्ये पाठविले.
श्री सुरावार सरांनी आपल्या कौशल्याने व अभ्यासुवृत्तीमुळे प्रादेशिक उपायुक्त नागपूर यांच्याकडे मुदतीच्या आत अपील करून मी अतिरिक्त ठरत नाही, हे नियमालाधरून प्रादेशिक उपायुक्तांना सुनावणीच्या वेळी स्पष्ट सांगितले. त्यामुळे प्रादेशिक उपायुक्ताने मान्य केले. त्यानुसार संस्था अध्यक्षांनी सुनावणीत ठरल्याप्रमाणे मला रुजू करून घेण्याचे मान्य केले.परंतु मी जेव्हा दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो तेव्हा मुख्याध्यापकाने मस्टरवर सही करू देण्यास नकार दिला. मला बसण्या साठी खुर्ची सुद्धा देत नव्हते. बेंच होता तोही खोलीमध्ये घेऊन जात होते.७ महिने मला मुख्याध्यापक व संस्था अध्यक्ष यांनी मला खूप त्रास दिला.परंतु माननीय सुरावार सरांच्या खंबीर नेतृत्वामुळे मी अजिबात डगमगलो नाही. सतत लढत राहिलो.
अखेर ७ महिन्याचे थकीत वेतन मुख्याध्यापक व माननीय सहाय्यक आयुक्तांना काढण्यासाठी माननीय सुरावार सरांनी भाग पाडले व मला ७ महिन्याचे थकीत वेतन सुद्धा मिळवुन दिले.
पुन्हा ११ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा माझी विभागीय चौकशी लावली परंतु त्या चौकशी समितीचे प्रतिनिधी म्हणून माननीय सुरावार सर स्वतः माझे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले व सदर विभागीय चौकशी बेकायदेशीर आहे.हे सिद्ध करून विभागीय चौकशी बंद केली.
अशाप्रकारे खंबीरपणे सतत संघर्ष करत अखेर दिनांक २ डिसेंबर २०२२ ला माझ्या पेन्शनचा प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्याध्यापकाला व प्रशासनाला सुरावार सरांनी भाग पाडले व ४ वर्षाच्या संघर्ष लढ्याला अखेर यश मिळाले.
माझे शिक्षक बंधू भगिनींना आवाहन आहे की अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची आपली स्वतःची मानसिकता आपण प्रथम तयार केली पाहिजे.माननीय सुरावार सरांनी जिल्ह्यातील व परजिल्हातील अनेक अन्यायग्रस्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही एकमेव अशी संघटना आहे की अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी एकमेव संघटना आहे.
माननीय श्री संतोष सुरावार सर यांच्या अचूक मार्गदर्शनाने व सहकार्याने मला पेन्शन मिळेपर्यंत च्या लढाईत मानसिक धैर्य व मनोबल वाढवून मला यश मिळवून दिले .
तसेच माननीय श्री नागोजी गाणार सर यांनी सुद्धा वेळोवेळी सतत मार्गदर्शन व कायदेविषयक प्रशासनाकडे पाठपुरावा करून मला न्याय मिळवून दिला .







