विकास कामे गुणवत्तापुर्वक व वेळेत पुर्ण करा : पालकमंत्री एकनाथ शिंदे

126

विकास कामे गुणवत्तापुर्वक व वेळेत पुर्ण करा : पालकमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

• यावर्षी 2020-21 साठी सुधारीत अर्थसंकल्पित 439.74 कोटींची तरतूद

• पुढिल वर्षीच्या 2021-22 साठी प्रारूप आराखडयात 356.39 कोटी प्रस्तावित तर अतिरीक्त मागणी 510.18 कोटींची

• येत्या 8 फेब्रुवारीला प्रारूप आराखड्यावर मुंबई येथे बैठक

• मागील वर्षी सन 2019-20 मध्ये 99.68 टक्के म्हणजेच 480.83 कोटी झाला खर्च

• पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

गडचिरोली,(जिमाका)दि.30. : पालकमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या सभागृहात पार पडली. यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करण्याचे तसेच त्यानिधीतून गुणवत्तापूर्ण काम कसे होईल याबाबत अधिकाऱ्यांना लक्ष घालून काम करावे असे निर्देश दिले. कोरोना काळात निधी बाबत प्रश्न निर्माण झाले होते मात्र आता शंभर टक्के निधी जिल्हा वार्षिक मधू वितरीत करण्यात आला आहे. मंजूर कामे करण्यासाठी वेळ कमी असला तरी ती वेळेत पुर्ण करताना कोणत्याही प्रकारे गुणवत्तेमध्ये बदल करता कामा नये अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. यावर्षी 2020-21 साठी सुधारीत अर्थसंकल्पित 439.74 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 38 टक्के खर्चही झाला आहे. पुढिल वर्षीच्या प्रारूप आराखडयावर या बैठकित चर्चा झाली. पुढिल वर्षासाठी 356.39 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत तर अतिरीक्त मागणी 510.18 कोटींची आहे. याबाबत जास्तीत जास्त निधी जिल्हयासाठी मिळवून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी बैठकित आश्वासन दिले. येत्या 8 फेब्रुवारीला प्रारूप आराखड्यावर मुंबई येथे बैठक लावण्यात आली असून शासनाकडून निश्चितच आकांक्षित गडचिरोली जिल्हयासाठी जास्तीचा निधी मंजूर करून घेवू असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. मागील वर्षी सन 2019-20 मध्ये 99.68 टक्के म्हणजेच 480.83 कोटी झाला खर्च झाला असून यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. आज उपस्थितामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, सर्वश्री आमदार अभिजीत वंजारी, रामदास आंबटकर, धर्मराव आत्राम, कृष्णा गजबे, डॉ.देवराव होळी, प्रधान सचिव, नगरविकास महेश पाठक, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शिवाद, प्रकल्प अधिकारी मनोज जिंदाल व आशिष येरेकर उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा वार्षिक आराखडयाचे सादरिकरण जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी केले.

जिल्हयातील विविध समस्यांवरही चर्चा. : जिल्हा वार्षिक योजनेतून विविध कामांची अंमलबजावणी करताना आलेल्या अडचणी व इतर विकास कामांमधील अडचणींवर उपसिथत लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी वन विभागाकडून आवश्यक असलेल्या मंजूरी वेळेत देणेबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले. आदिवसी व दुर्गम भागातील विकास प्रक्रियेत वन विभागाकडून अडचणी निर्माण होता कामा नये तसेच जिल्हयाचा विकास करून नक्षलवाद कमी करायचा आहे. यासाठी सर्व विकासाठी लागणाऱ्या परवानग्या तातडीने द्याव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्हयातील धान खरेदी बाबत असलेल्या अडचणीवरही चर्चा झाली. वन पट्टेधारक शेतकऱ्यांच्या धान खरेदीमधील अडचणी राज्य स्तरावरून सोडविण्यात आले आहेत. त्यांचे धान खरेदी ऑनलाईन होत असल्यामूळे त्यामध्ये काही अडचणी होत्या. त्या आता दूर झाल्या आहेत. तसेच अतिक्रमण्रा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे धान खरेदीबाबत शासनाला प्रस्ताव पाठवून त्यावरही तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.

विविध विकास कामांचे लोकर्पण : गडचिरोली जिल्हयातील आरमोरी प्रशासकीय इमारत, बाल रुग्णालय, आरमोरी, उपविभागीय व तहसिल कार्यालय कुरखेडा, मायक्रो एटिएम इ. कामांचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने पार पडले. यावेळी त्यांनी जिल्हयातील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या कामांची प्रशंसा पालकमंत्र्यांनी केली. आरमोरी व कुरखेडा मधील सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली आहेत. जिल्हा सामन्य रुग्णालयातील आतिदक्षता विभागाचेही लोकार्पण यावेळी झाले. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात अतिशय आवश्यक आणि चांगली व्यवस्था उभी करण्यात आली आहे असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्ह्यात मोठ्या शहरातील खाजगी रूग्णालयासारखी व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालय या शासकीय दवाखान्यात करण्यात आली आहे ही विशेष बाब असे ते पुढे म्हणाले. याचवेळी नव्याने सुरू झालेल्या आरटीपीसीआर या आत्याधुनिक प्रयोगशाळेचेही उद्घाटन त्यांचेहस्ते करण्यात आले. यानंतर कलेक्टर कॉलनीमध्ये शासकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या पाळणाघराचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आला.

**